महाबळेश्वरला जाण्याचा प्लान करताय ? नवी नियमावली वाचूनच जा !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० जानेवारी । ओमिक्रॉनच्या (Omicron Scare) पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली जाहीर केली असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाबळेश्वरमधील सर्व पाॅईंट बंद करण्यात आले असून अम्युजमेंट पार्क, वेण्णा लेक बोटिंग पाॅईंट सुद्धा बंद करण्यात आले आहेत. लाॅजिंग मात्र १०० टक्के क्षमतेने सुरू राहणार असून रेस्टाॅरंट ५० टक्के क्षमतेने सुरू असल्याची माहिती महाबळेश्वर नगरपालिकरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली आहे.

आठवडाभरापासून सातारा जिल्ह्यामध्ये करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असून त्याचा फटका महाबळेश्वर येथील पर्यटनाला बसला आहे. जिल्ह्यात करोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे महाबळेश्वर येथील प्रसिद्ध असणारा वेण्णा लेक बोट क्लब नगरपालिका प्रशासनाने बंद केला आहे. तसेच, पर्यटन स्थळावर करोना बाबतची नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांनी लसींचे दोन्ही डोस घेतलेले असणं आवश्यक आहे, अशी माहिती महाबळेश्वर नगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी विशेष काळजी महाबळेश्वरमध्ये घेतली जात आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान महाबळेश्वर तालुक्यात सर्वात कमी रुग्ण नोंदवले गेले होते. त्यामुळे आता येणाऱ्या तिसऱ्या लाटेत सुद्धा रुग्णवाढ होऊ नये यासाठी महाबळेश्वर नगरपालिकेने पूर्ण खबरदारी घेतली आहे. महाबळेश्वरमध्ये येणारे पर्यटक हे मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांतून येतात. त्या पार्श्वभूमीवर करोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *