महाराष्ट्र २४ ऑनलाईन ; मुंबई – मुंबई महानगर प्रदेशासह नागपूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अत्यावश्यक वस्तू आणि सेवा सोडून सर्व गोष्टी बंद ठेवण्यात येणार आहेत. कार्यालयेही बंद ठेवण्यात येत आहेत. ३१ मार्चपर्यंत हा बंद राहणार आहे. त्यामुळे बाहेर फिरायला जाऊ नका. ही फिरण्यासाठीची सुट्टी नाही. हे आपणच आपल्यावर घातलेलं बंधन आहे. त्यामुळे घरातच बसा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह चार शहरात बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला. जगण्यासाठी प्रत्येकजण संघर्ष करत असतो. पण आता तुम्हाला जगण्यासाठी घरात थांबावं लागणार आहे. सुट्टी मिळाली म्हणून चला फिरून येऊ, असा विचार करू नका. रेल्वे आणि बसमध्ये गर्दी करू नका. तुमची काळजी घेण्यासाठी ही सुट्टी देण्यात येत आहे. ही फिरण्यासाठीची सुट्टी नाही. त्यामुळे घरीच बसा, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं.
रेल्वे आणि बसेस या अत्यावश्यक सेवा आहेत. त्या बंद करण्यात येणार नाही. पण बंद करण्याची वेळ येऊ देऊ नका असं मी वारंवार सांगतोय. मात्र रेल्वे आणि बसमधील गर्दी फारशी कमी झालेली दिसत नाही. ही गर्दी कमी करणं तुमच्या हातात आहे. सुट्टी आहे म्हणून लोकलमध्ये गर्दी करू नका. मला रेल्वे आणि बसेस बंद करण्याचा निर्णय घ्यायला भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी दिला. आपण गर्दी होणाऱ्या सर्व गोष्टी बंद करत आहोत. त्यामुळे गर्दी ओसरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.