महाबळेश्‍वरमध्ये काश्मिरी थंडीचा फिल ; पारा ४ अंशावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ जानेवारी । जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्‍वर मध्ये थंडीचा कडाका वाढला असून, मंगळवारी पारा 4 अंशापर्यंत घसरला. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली. अवघे जनजीवन गारठून गेले. कडाक्याच्या थंडीसोबतच गार वारे वाहत असल्याने पर्यटक महाबळेश्‍वरमध्ये काश्मिरी थंडीचाच फिल अनुभवत आहेत. थंडीचा पारा असाच खाली येत राहिला तर एक ते दोन दिवसांत वेण्णा लेकसह लिंगमळा परिसरात हिमकण तयार होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्‍वर शहर व परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य येथे पाहायला मिळत आहे. वेण्णा लेक परिसर, लिंगमळा परिसरातही थंडी चांगलीच जाणवत आहे. मंगळवारी तापमान घसरल्याने वेण्णालेक परिसर पहाटे धुक्याच्या दुलईत लपेटला गेला. पारा 4 अंशांपर्यंत खाली आल्यामुळे वेण्णालेक, लिंगमळा धबधबा परिसरात प्रचंड थंडी निर्माण झाली. नागरिक काकडून गेले.

पर्यटक शाल, स्वेटर, कानटोपी परिधान करून शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये फेरफटका मारताना दिसून येत आहेत. वेण्णा लेक परिसरात थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिकांनी शेकोटीचा आधार घेतल्याचे चित्र पहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *