ITR आणि ऑडिटसाठी मुदतवाढ; जाणून घ्या कोणत्या करदात्यांना मिळाला दिलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ जानेवारी । करोनाचा उद्रेक लक्षात घेत प्राप्तिकर विभागाने आज मंगळवारी प्राप्तिकर रिटर्न आणि ऑडिट सादर करण्यासाठी मुदतवाढ जाहीर केली. त्यानुसार काही विशिष्ट श्रेणीतील करदात्यांना याचा लाभ होणार आहे. दरम्यान, वेतनदार, वैयक्तिक करदात्यांसाठी मात्र या घोषणेचा कोणताही फायदा नाही. त्यांच्यासाठी आता विवरणपत्र सादर करताना विलंब शुल्काचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी कर विवरण ऑटिडसह सादर करण्यास १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी ३० सप्टेंबर २०२१ ही अंतिम मुदत होती. त्यानंतर ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

प्राप्तिकर कलम ९२ ई नुसार आंतरराष्ट्रीय व्यवहार करणाऱ्या लेखा अहवाल सादर करण्यास १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तत्पूर्वी यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. लेखा अहवाल आणि विवरण सादर करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२१ ही अंतिम मुदत होती. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२१ आणि ३१ जानेवारी २०२२ अशी दोनदा मुदतवाढ देण्यात आली.

याशिवाय प्राप्तिकर कलम १३९ च्या पोट कलम (१) नुसार प्राप्तिकर विवरण पत्र सादर करण्यास आता १५ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, आयटीआर -१ , आयटीआर -२ आणि आयटीआर – ४ विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपुष्टात आली आहे. त्याला कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *