महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ जानेवारी । गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात गेले तीन दिवस काही प्रमाणात घटलेल्या करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात करोनाचे ४६ हजार ७२३ नवे रुग्ण आढळल़े तर एकट्या मुंबईत दिवसभरात १६ हजार ४२० नवे रुग्ण आढळले. रुग्णसंख्येतील वाढ कायम असल्याने जास्तीत जास्त लसीकरण करण्याकडे राज्य सरकारचा कल आहे. पात्र लोकसंख्येला शक्य तितक्या लवकर करोना डोस देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच लसीचा तुटवडा असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
“महाराष्ट्रात कोवॅक्सिन लसीचा तुटवडा आहे. याबाबत आम्हाला अनेक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सवर झालेल्या बैठकीमध्ये आम्ही राज्यातील लसीकरण वाढवण्यासाठी कोविशील्डच्या ५० लाख डोस आणि कोव्हॅक्सिनच्या ४० लाख डोसची मागणी केली आहे,” असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
There is a shortage of Covaxin in Maharashtra. We're getting calls from district authorities in this regard. In the VC with Union health minister, we demanded 50 lakh doses of Covishield & 40 lakh doses of Covaxin to ramp up vaccination: State Health Minister Rajesh Tope (12.01) pic.twitter.com/gsyvuK2qPG
— ANI (@ANI) January 13, 2022
“महाराष्ट्रात लसीकरणाचा दर कमी झालाय”
राजेश टोपे म्हणाले, “लसीकरणाचा दर कमी झालाय. आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. मात्र, सध्या केवळ साडेसहा लाख लोकांचंच लसीकरण होत आहे एकेकाळी राज्यात दररोज ८-१० लाख लसीकरण होत होतं. ते चित्र कमी झालंय. त्याला गती प्राप्त झाली पाहिजे. यासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.”
“संख्या वाढत असली तरी घाबरून जाण्याची परिस्थिती असू नये, कारण…”, राजेश टोपेंचं जनतेला आवाहन
“राज्यात पहिला लसीचा डोस घेणाऱ्यांचं प्रमाण ९० टक्के झालंय. दोन डोस घेतलेल्यांचं प्रमाण ६२ टक्के आहे, तरीही आपण देशाच्या सरासरीच्या थोडे मागे आहोत. त्यामुळे ते योग्य नाही. आपण खरंतर मार्गदर्शक राज्य आहे. त्या दृष्टीने पुढे गेलं पाहिजे. आम्ही केंद्राकडे लसींची संख्या वाढवून मागितली आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.