महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ जानेवारी । देशात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशात आता केंद्र सरकारनं कोरोना रुग्णांच्या डिस्चार्ज पॉलिसीत (Discharge Policy) बदल केले आहेत. कोरोनाच्या हलक्या आणि मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांना पॉझिटीव्ह आल्यानंतर कमीत कमी सात दिवस आणि सलग तीन दिवस ताप न आल्यास सुट्टी दिली जाणार आहे. या रुग्णांना डिस्चार्ज आधी कुठलीही टेस्ट करण्याची गरज नाही. हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत कोरोना (Coronavirus)संदर्भात काल झालेल्या बैठकीनंतर करण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं की, मध्यम श्रेणीतील रुग्ण, विना ऑक्सिजन सपोर्ट आणि सतत तीन दिवस 93 टक्क्यांहून अधिक सॅच्युरेशन असलेले रुग्ण कुठल्याही तपासणीशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्यानं घरी जाऊ शकतात. जे रुग्ण सतत ऑक्सिजन थेरेपीवर आहेत त्यांनी लक्षणांबाबत समाधान झाल्यावर ऑक्सिजन सपोर्ट विना सलग तीन दिवस राहिल्यानंतर त्यांची क्षमता पाहून त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.
त्यांनी म्हटलं आहे की, इम्युनोकॉम्प्रोमाइज्डसह अन्य गंभीर प्रकरणातील रुग्णांचा डिस्चार्ज मात्र क्लिनिकल रिकव्हरीवर अवलंबून असेल. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडु, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ होत आहे. यामुळं चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र लव अग्रवाल यांनी सांगितलं आहे की, WHO च्या मते डेल्टावर ओमायक्रॉन (Omicron) हा चांगला उपाय म्हणून समोर येतोय. दक्षिण आफ्रिका, यूके, कॅनडा, डेन्मार्कच्या तुलनेत भारतात ओमायक्रॉन रुग्णांना दवाखान्यात भर्ती करण्याची जास्त गरज पडलेली नाही.