महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ जानेवारी । आज मकर संक्रातीनिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. पंढरीत देखील हा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रत्येक सणाला विठ्ठल मंदिरात वेगवेगळ्या पद्धतीनं सजावट करण्यात येते. पुणे येथील भक्तांनी विठ्ठल मंदिराला 60 प्रकारच्या फळं भाज्या , सुगंधी फुले , तिळगुळ आणि पतंगांचा वापर करून अतिशय मनोहर अशी सजावट केली आहे.पुणे येथील विठ्ठल भक्त राहुल ताम्हाणे , राजू नाईक , सचिन शितोळे आणि अमोल शेरे यांनी विठुरायाच्या चरणी ही सजावटीची सेवा दिली आहे .यंदा प्रथमच या सजावटीसाठी 60 प्रकारच्या फळं भाज्यांचा कल्पकतेने वापर केला आहे.हे पाहून कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या संत सावता माळी यांच्या अभंगाची आठवण होते आहे .या सजावटीमध्ये गवार , भेंडी . फ्लॉवर , मुळा , गाजर , वांगी , कोबी , बिट आणि दोडका यासारख्या फळबाजा वापरण्यात आलेल्या आहेत .याशिवाय फुलांचा वापर करताना मधूनच तिळगुळ आणि पंतंगांचा देखील सुरेख रीतीने वापर करण्यात आला आहे .यासाठी साधारण दीड टन फळभाज्या व फुलांचा वापर करण्यात आला आहे .