महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ जानेवारी । राज्यातील दुकानांवर ठळक अक्षरात मराठी पाटी लावण्याच्या निर्णयाला विरोध करु पाहणाऱ्या व्यापाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) ‘खळखट्याक’चा इशारा देण्यात आला आहे. ज्या व्यापारांचा मराठी पाटीला विरोध आहे, त्यांना एकच प्रश्न आहे पाटी बदलण्याचा खर्च जास्त आहे की, दुकानाच्या काचा बदलण्याचा??, असे सूचक ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे. त्यामुळे दुकानांवर मराठी पाट्या लावण्यास विरोध करणाऱ्यांविरोधात मनसेकडून पुन्हा एकदा मोहीम हाती घेतली जाण्याची शक्यता आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही गुरुवारी या मुद्द्यावरुन विरोध करणाऱ्यांना इशारा दिला होता. महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा आम्हाला करायला लावू नका, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे.
ज्या व्यापारांचा मराठी पाटी ला विरोध आहे त्यांना एकच प्रश्न आहे पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा??
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 14, 2022
महाराष्ट्रातील दुकानांवर ठळक आणि मोठ्या अक्षरात मराठी पाट्या लावण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर मुंबईत शिवसैनिक अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन दुकानदारांना यासंबंधी सूचना द्यायला सुरुवात केली आहे. मुंबईच्या विलेपार्ले परिसरात गुरुवारी शिवसैनिकांकडून दुकानदारांना स्मरणपत्रे वाटण्यात आली. या माध्यमातून दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची आठवण व्यापाऱ्यांना करुन देण्यात आली. आता मुंबईसह राज्याच्या इतर भागांमध्येही शिवसेना असाच उपक्रम राबवणार का, हे पाहावे लागेल. शिवसेना बऱ्याच दिवसांनी मराठीच्या मुद्द्यावरुन अशाप्रकारे रस्त्यावर उतरली आहे.