महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; रोम: जगभरात करोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच आहे. करोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला असून भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. इटलीत चीनपेक्षाही सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे. मागील २४ तासांत इटलीत ६२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तब्बल ५९८६ नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. आतापर्यंतचा हा सर्वोच्च आकडा आहे.
मागील २४ तासांत इटलीमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे. इटलीत एकाच दिवसांत ५९८६ नवे रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली असून जगभरात चिंतेचे वातावरण आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ४७ हजार २१ इतकी झाली आहे. तर, मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. इटलीत करोनाच्या संसर्गामुळे ४०३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २६५५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. करोनाच्या संसर्गामुळे उपचार सुरू असलेल्या ५१२९ जणांनी करोनावर मात केली आहे. मात्र, इटलीत रुग्ण आणि मृत्यूंचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.
चीन व इटलीमध्ये करोनाच्या संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू हे वृद्धांचे झाले असल्याची चर्चा आहे. वृद्ध नागरिकांमध्ये आधीपासूनच कोणता तरी आजार असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. तर, चीनमध्ये करोनावर नियंत्रण मिळवले असल्याचे सध्या चित्र आहे. चीनमध्ये नवीन करोनाबाधित रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे.