महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ जानेवारी । हल्लीची चुकीची जीवनशैलीची, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी अशा अनेक कारणांमुळे 30-40व्या वर्षीच चेहऱ्यावर आणि शरीरावर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. काही वेळा शारीरिक थकवाही जाणवू लागतो. त्यामुळे या काळात आरोग्य, खाणेपिणे याबाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरावरील वृद्धत्वाची लक्षणे थांबवणे नियंत्रणाबाहेर असले तरी आरोग्याची काळजी, आहाराकडे लक्ष दिले, याबाबतीत विशेष खबरदारी घेतली तर वाढत्या वयाचे परिणाम बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात. जीवनशैलीशी संबंधित काही आवश्यक पद्धती आणि सवयी यांचा अवलंब करून तुम्ही वयाच्या चाळीस किंवा त्यापेक्षाही कमी वयात तरुण दिसू शकता.
आरोग्य चांगले ठेवण्यासाठई रात्री लवकर झोपावे आणि सकळी लवकर उठले पाहिजे. तसेच रात्रीचे जेवण आणि त्यानंतर झोप यामध्ये दोन तासांचे अंतर असायला हवे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेकदा रात्रीचे जागरण करणे, रात्री उशीर जेवणे, सकाळी उशीरा उठणे अशा सवयी बऱ्याच जणांना असल्याचे दिसते, यामुळे शरीरातील मेद, कर्बोदके यासारखे ऊर्जा देणाऱ्या घटकांचा शरीराला योग्यरित्या फायदा होत नाही. त्यामुळे मधुमेह, ह्रदयविकार यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषत: वाढत्या वयात या समस्या दिसून येऊ लागतात. त्यामुळे आरोग्य चांगले राखण्यासाठी दैनंदिन जीवनात लवकर झोपण्याची आणि उठण्याची सवय स्वत:ला लावणे आवश्यक आहे.
दूध, फळे, ऋतुमानानुसार मिळणाऱ्या भाज्या, पालेभाज्या यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. दररोज संतुलित आहार घ्यावा. यामुळे शरीराला पुरेशी पोषक तत्त्वे मिळतात, जीवनसत्त्वांची कमतरता भरून निघते. वाढत्या वयात जीवनसत्त्व सप्लिमेंट घेणे हा सर्वात स्वस्त आणि उत्तम पर्याय आहे. यासाठी जीवनसत्त्व सी, ई आणि डी सप्लिमेंट्सचा आहारात समावेश करू शकता.
फळे आणि हिरव्या भाज्यांचे जास्तीत जास्त सेवन करायला हवे, कारण हे शरीराला जीवनसत्त्वे मिळवून देणारे ही नैसर्गिक पोषक तत्त्वे आहेत. यामुळे वृद्धत्वाच्या प्रभावापासून मोठ्या प्रमाणात रक्षण होते.
आहारात चणे, शेंगा, मूग, उडीद, सोयाबीन या बीयुक्त अन्नपदार्थांचा समावेश करावा, याशिवाय सूर्यफूल, भोपळा या भाज्यांच्या बियांचे सेवनही करावे. यामध्ये शरीराला स्नायू आणि हाडांसाठी आवश्यक असणारी प्रथिने असतात. तसेच खनिजे, फायबर, फायटोन्यूट्रिएंट्स यांची कमतरतादेखील यामुळे भरून निघते. शरीरासाठी आवश्यक असलेली अॅमिनो अॅसिड्सही यामध्ये असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची बियाणे, बीयुक्त भाज्या, त्यांच्या बियांचा आहारात समावेश करावा.