महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ जानेवारी । स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 23 जानेवारी या जयंतीपासून देशाचा प्रजासत्ताक दिन समारंभ सुरू होणार आहे. त्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आतापर्यंत 24 जानेवारीपासून प्रजासत्ताक दिन समारंभ सुरू होत होता.
देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात सुभाषचंद्र बोस यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याची नव्या पिढीला माहिती व्हावी म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. नागरिकांना देशाचा स्वातंत्र्यलढा, हिंदुस्थानची संस्कृती आणि तत्कालीन अन्य घटकांचे स्मरण व्हावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला असल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे. नेताजींचा जयंती दिवस हा ‘पराक्रम दिवस’ म्हणूनही साजरा केला जात आहे. दरम्यान, 14 ऑगस्ट ‘फाळणी स्मरण दिवस’, सरदार वल्लभभाई पटेल यांचा 31 ऑक्टोबर हा जयंती दिवस ‘राष्ट्रीय एकता दिवस’, बिरसा मुंडा यांचा 15 नोव्हेंबर हा जयंती दिवस ‘जनजातीय गौरव दिवस’, 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’, 26 डिसेंबर हा ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.
26 जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱया प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला यंदा केवळ 24 हजार लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे. यामध्ये 19 हजार निमंत्रित असणार आहेत, तर उर्वरित पाच हजार लोकांना पास घ्यावा लागणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या आधी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला तब्बल सव्वा लाख लोकांना हजर राहण्याची परवानगी दिली जात होती, मात्र गेल्या दोन वर्षांपासून यावर मर्यादा आणल्या आहेत. मागील वर्षी या कार्यक्रमासाठी 25 हजार लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. दरम्यान, कोरोनामुळे यंदाही या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून परदेशी नेत्याला निमंत्रित केलेले नाही.