गुलकंदाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ जानेवारी । गुलाब फुलाचा वापर सौंदर्यप्रसाधनात मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र गुलाब हे फुल फक्त सौंदर्यापुरतेच महत्वाचे नाही कारण या गुलाबापासून बनविला जाणारा गुलकंद आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. विशिष्ट जातीच्या गुलाबाच्या पाकळ्या साखरेत मुरवून हा गुलकंद तयार होतो आणि घरच्याघरी सुद्धा बनविता येतो. साखर किंवा मध आणि गुलाब पाकळ्या एकत्र मुरवत ठेवल्या की त्यातून काही दिवसात गुलाबाच्या पाकळ्यातून येणारा रस एकजीव होतो आणि गोड, सुगंधी आणि औषधी गुलकंद तयार होतो.

आयुर्वेदात या गुलकंदाचे अनेक फायदे सांगितले आहेत. काही खास आजारात औषधे अधिक प्रभावी ठरावीत यासाठी गुलकंदासोबत घेण्याचा सल्ला दिला जातो. फार गरम खाल्ल्याने किंवा फार तिखट खाल्ल्याने पोटात जळजळ होते किंवा पित्त वाढते अश्यावेळी १-२ चमचे गुलकंद पोटात गारवा निर्माण करतो.

पोट साफ होत नसेल किंवा गरोदरपणात बध्दकोष्ठता होत असेल तर जेवणानंतर १-२ चमचे गुलकंद खावा. त्याने पचन सुधारते आणि आतड्यात उपयुक्त जीवाणू वाढविण्यास मदत मिळते. तोंड आले असेल तरी गुलकंद खावा. गुलाबजल आणि गुलकंद नियमित सेवन केल्यास चेहऱ्यावर पुटकुळ्या मुरुमे येत नाहीत. त्वचेसाठी गुलकंद फार फायदेशीर असून त्वचेत साठलेली अशुद्ध द्रव्ये त्यामुळे बाहेर टाकली जातात.

शांत झोपेसाठी गुलकंद अवश्य खावा. रात्री झोपण्यापूर्वी अर्धातास आधी दुधाबरोबर गुलकंद खाल्ल्यास मन शांत होते. दुध आणि गुलकंद मुळे मेंदूतील मेलाटोनिन हार्मोन अधिक प्रमाणात तयार होते व त्यामुळे मन शांत होऊन चांगली झोप लागते. गुलकंद सेक्स हार्मोन वाढविणारा असून पुरुष आणि महिला दोघांनाही त्याचा फायदा होतो. यामुळेच कदाचित गुलाबाला प्रेमाचे प्रतिक मानले जात असावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *