कोंड्याचा त्रास ; हिवाळ्यात हे बदल करा आणि मिळवा कोंड्यापासून मुक्ती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ जानेवारी ।हिवाळ्यात केस वरचेवर धुऊनही कोंड्याची समस्या डोकं वर काढतेच. त्यापासून सुटका व्हावी म्हणून तुम्ही केसांची निगा राखण्याच्या सवयींमध्ये काही बदल करू शकता. हे बदल केल्याने तुम्हाला कोंड्यापासून मुक्ती मिळवता येऊ शकते.

शांपूनंतर हे अवश्य करा
अनेकींना असं वाटतं की, वारंवार शांपू केल्याने कोंडा निघून जातो. पण, असं अजिबात नाही. शांपूव्यतिरिक्त काही घरगुती उपायांनी कोंडा घालवता येऊ शकतो. शांपूमध्ये टी ट्री ऑईल मिसळून तुम्ही ते केसांना लावू शकता. केसांना शांपूने धुण्यापूर्वी तुम्ही कोरफडीचा गरही केसांना आणि डोक्याच्या त्वचेला लावू शकता. तसंच, शांपूनंतर काही प्रमाणात ग्लिसरीन देखील लावू शकता. त्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाबपाण्याचं मिश्रण तयार करा आणि डोक्यावरील त्वचेवर मसाज करा.

तेल लावण्याची पद्धत
कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी सतत तेल लावून ठेवणं गरजेचं नाही. केसांना जास्त काळ तेल राहिल्याने त्यात धूळ जमा होऊन केसांच्या अन्य समस्या सुरू होऊ शकतात. कारण, तेलामुळे एक पातळ आवरण तयार होतं, ज्यामुळे नैसर्गिक आर्द्रता डोक्याच्या त्वचेत मुरत नाही. त्यामुळे तेल फक्त रात्री लावा जेणेकरून ते सकाळी धुता येतील. केसांना लावण्याच्या तेलातही तुम्ही बदल करू शकता. नेहमीच्या तेलात इसेन्शियल ऑईल मिसळून ते डोक्याला लावा.

हॉट टॉवेल थेरपी
कोंडा घालवण्यासाठी हॉट टॉवेल थेरपीचा खूप उपयोग होतो. यासाठी एक मोठा टॉवेल गरम पाण्यात काही काळ बुडवून ठेवा. तो पुरेसा गरम झाला की बाहेर काढा आणि घट्ट पिळा. तो पिळलेला टॉवेल केसांभोवती थोडावेळ गुंडाळून ठेवा आणि काही वेळाने काढा. ही प्रकिया चार ते पाच वेळा करा. यामुळे तुमच्या केसाला नैसर्गिक आर्द्रता मिळेल तसंच कंडिशनरचे फायदे मिळू लागतील.

स्वच्छतेची काळजी
कोंड्याच्या अनेक कारणांपैकी एक अस्वच्छता हे आहे. बरेच वेळा झोपताना किंवा डोकं झाकण्यासाठी वापरला जाणारा कपडा स्वच्छ नसतो. त्यामुळे कोंड्यात वाढ होऊ शकते. उशांचे अभ्रे, केसांचा बँड, कंगवा, हेअरपिन्स, क्लिप्स हे सगळं नीट स्वच्छ करूनच वापरलं जाणं आवश्यक आहे. बाहेर पडताना देखील केसांवर स्कार्फ किंवा स्टोल वापरून त्यांना धूळमातीपासून वाचवणं गरजेचं आहे. अशा स्वच्छतेमुळे कोंड्याची समस्या कमी होते.

आठवड्यातून एकदा डीप कंडिशनिंग
डोक्यावरील त्वचेवर अधिक प्रमाणात तेल आणि कोरडेपणा या दोन्ही कारणांमुळे डोक्यात कोंड्याची निर्मिती होते. त्यामुळे केसांना दर आठवड्यातून एकदा डीप कंडिशनिंगची गरज असते. त्यासाठी तुम्ही घरगुती पदार्थ वापरून हेअरमास्क तयार करू शकता. तो अर्धा ते पाऊण तास केसांवर लावून ठेवा. त्यानंतर सौम्य शांपूने केस धुवा. पण, हा मास्क बनवण्यासाठी असेच पदार्थ वापरा जे कोंड्याची निर्मिती रोखू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *