महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे ह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी ते त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. राज्य सरकारनं अनेक शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा सोडून लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आरोग्यमंत्री आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. शरद पवार हे देखील राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
महानगरात सक्तीची बंदी
करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आदी), पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमधील सर्व दुकाने, खासगी कार्यालये, आस्थापने, कारखाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी घेतला. या बंदमधून दूधविक्री केंद्रे, जीवनावश्यक वस्तुविक्री दुकाने, किराणा दुकाने, बँका, औषधांची दुकाने वगळण्यात आली आहेत.