आव्हाडांचा इशारा ; म्हणाले, “विरोध करणार, कलाकाराचा वेष घेऊन…”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ जानेवारी । राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना विरोध होऊ लगाला आहे. आधी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी यासंदर्भात विरोध दर्शवल्यानंतर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंनी ही भूमिका साकारण्यावर आक्षेप घेतलाय.

कधी प्रदर्शित होणार हा चित्रपट?
अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते असे त्यांनी म्हटले आहे.

अमोल कोल्हे नक्की काय म्हणाले?
“२०१७ साली या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. ज्यावेळी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारली होती. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो. माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत,” असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

आव्हाड यांचा विरोध…
मात्र जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंनी ही भूमिका साकारल्याचा निषेध नोंदवलाय. “अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही,” अशा शब्दांमध्ये आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय.

तसेच पुढे बोलताना, “विनय आपटे, शरद पोंक्षे यांना या भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेने प्रचंड विरोध केला त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार,” असंही आव्हाड म्हणाले आहेत.

“कलाकार आणि माणूस दोन वेगळ्या भूमिका नाहीत. पण जेव्हा गांधी साकारता भूमिका बदलत नाही कारण ती वैचारिक भूमिका आहे. नथुराम महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. कलाकार म्हणून अमोल कोल्हे महान आहेत, पण त्यांनी केलेल्या अभियानाचा विरोध आहे,” असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *