राज्यात 1 फेब्रुवारीपासून तमाशाचा फड रंगणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ जानेवारी । कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यातही नाट्यगृहातील कार्यक्रमांना ५० टक्के प्रेक्षकांमध्ये परवानगी मात्र लोकनाट्य तमाशा आणि तत्सम कार्यक्रम पूर्णत: बंद ठेवण्यात आले होते. तमाशा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर १ फेब्रुवारीपासून लोकनाट्य तमाशा आणि तत्सम कार्यक्रमांना परवानगी देण्यात आल्याचे तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

कोरोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हापासून लोकनाट‌्य तमाशा मंडळाचे हाल सुरू झाले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुख्यत: लॉकडाऊनमध्ये तर तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. काही संस्था, संघटना आणि नेतेमंडळींनी आर्थिक मदत केल्याने तमाशा कलावंतांनी आणि फडांनी तग धरला. मधल्या काळात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर काही ठिकाणी तमाशाचे खेळ सुरू होत नाही तोच पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने पुन्हा निर्बंध लादले गेले. त्यामुळे तमाशा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अतुल बेनके यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता.

बेनके यांच्यासह अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर, मोहित नारायणगावकर, मुसाभाई इनामदार, अविष्कार मुळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेत तमाशा कलावंतांच्या एकूणच विदारक परिस्थितीविषयी चर्चा केली.

यावर अजित पवार यांनी निर्णय घेत १ फेब्रुवारीपासून तमाशाला परवानगी देत असल्याचे जाहीर केले. लवकरच याचा अध्यादेश जारी करू, असे आमदार बेनके यांनी सांगितले. यामुळे तमाशा कलावंतांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तमाशाला परवानगी मिळाली, शिवाय मदतही जाहीर झाली आहे. त्यामुळे तमाशा कलावंत, फड मालक यांच्यासह रसिकांमध्येही आनंद आहे, असे विठाबाई नारायणगावकर लोकनाट‌्य तमाशा मंडळाचे माहित नारायणगावकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *