महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ जानेवारी । केंद्र सरकारतर्फे सोमवारी देशभरातील २९ मुलांना या वर्षीचे तर ३२ मुलांना गतवर्षासाठीचे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील शिवांगी काळेला शौर्य, जुई अभिजित केसकरला नावीन्यपूर्ण कार्य, संशोधन क्षेत्रासाठी श्रीनभ मौजेश अग्रवाल तर स्वयम पाटीलला क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला.
कोरोनामुळे प्रत्यक्ष पुरस्कार वितरण शक्य नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी प्रणालीद्वारे पुरस्कार विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्रांचे वितरण केले. यंदा २९ मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये नावीन्यपूर्ण कामगिरी करणारे सात, समाजसेवा क्षेत्रातले चार, शैक्षणिक क्षेत्रातला एक, क्रीडा क्षेत्रातल्या आठ, कला आणि संस्कृती क्षेत्रातल्या सहा तसेच शौर्य दाखवणाऱ्या तीन मुलांचा समावेश आहे.
देशातील २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १५ मुले आणि १४ मुलींचा यात समावेश आहे. नवी दिल्ली येथे सोमवारी राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांना एक लाख रुपये सन्मानधन देण्यात आले. ही रक्कम कार्यक्रमाच्या वेळेतच पारितोषिक विजेत्यांच्या खात्यांत ऑनलाइन हस्तांतरित करण्यात आली. या वेळी पंतप्रधानांनी विजेत्यांबरोबर आभासी संवाद साधला. या वेळी महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई उपस्थित होते.
जुई केसरकरने बनवले होते डिव्हाइस
पुण्यातील १४ वर्षांच्या जुई केसकर हिने पुण्यातील ऑर्चिड स्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच पार्किन्सन्स आजारावर एक अत्याधुनिक डिव्हाइस तयार केले आहे. जुईचे काका मागील आठ ते नऊ वर्षांपासून पार्किन्सन्स आजाराने ग्रस्त आहेत. या आजारात हात, पाय, शरीर थरथरते त्यामुळे हा आजार कमी होण्याच्या दृष्टीने जुईने हातमोज्यांसारखे डिव्हाइस तयार केले. त्याद्वारे आजारी व्यक्तीच्या हातात ते डिव्हाइस घातल्यानंतर त्याच्या शरीरातील डेटा एकत्रित केला जातो. त्याआधारे औषधोपचार करता येतात.
नागपूरकर श्रीनभ अग्रवालला संशोधन क्षेत्रात पुरस्कार
किशोर वयात संशोधन क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या श्रीनभ मौजेश अग्रवाल याने लहान वयातच वैज्ञानिक क्षेत्रात ओळख निर्माण केली आहे. त्याने स्वत: दोन पुस्तके लिहिली असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये त्याचे अनेक लेख छापून आले आहेत. याशिवाय ‘ट्रिपल लॉक बोर होल प्रोटेक्शन लीड’ वर त्याचे पेटंटदेखील प्रकाशित झाले आहे.
जळगावच्या शिवांगीला ‘राष्ट्रीय बालशौर्य’ पुरस्कार
५ जानेवारी २०२१ रोजी घरात पाणी तापवताना आईला विजेचा शॉक लागला. आईला काही तरी झाले म्हणून लहान बहीण तिच्याकडे धावली. मात्र, शिवांगीने तिला मागे खेचले. प्लास्टिकच्या स्टूलवर चढून बोर्डवरील बटण बंद केले. प्रसंगावधान दाखवत आईसह बहिणीचा जीव तिने वाचवला. याबद्दल सहा वर्षांच्या शिवांगी काळेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार दिला गेला.
नाशिकच्या स्वयम पाटीलने पार केली १४ किमी खाडी
नाशिकच्या स्वयम पाटीलला स्विमिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. स्वयमने १४ वर्षीय विशेष गटात (गतिमंद) एलिफंट गुफा ते गेटवे ऑफ इंडिया ही १४ किलोमीटर खाडी ४ तास ९ मिनिटांत पोहून पार केल्याचा विक्रम केला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वयमच्या आई-वडिलांचा सत्कार केला. पंतप्रधानांच्या हस्ते देशभरातील २९ मुलांना यंदाचे, तर ३२ मुलांना गतवर्षीचे पुरस्कार प्रदान; यात १४ मुलींचा समावेश आहे.