आरटीई प्रवेशाच्या नोंदणीचा मुहूर्त अखेर टळणार ?

 86 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २५ जानेवारी । आरटीई प्रवेशप्रक्रियेअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यासाठी शाळानोंदणीची प्रक्रिया 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करायची होती, तर 1 फेब्रु वारीपासून विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार होती; परंतु अद्याप शाळांचीच नोंदणी सुरू झालेली नाही. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या नोंदणीचा मुहूर्त टळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरवर्षीप्रमाणे सन 2022-23 या वर्षाची आरटीई 25 टक्के प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येणार आहे. त्याकरिता पुणे जिल्ह्यातील 25 टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची नोंदणी दिनांक 28 डिसेंबर ते दिनांक 17 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये करण्यात यावी. त्यासाठी जास्तीत जास्त 15 दिवसांचा वाढीव कालावधी देण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले होते.

25 टक्के प्रवेशप्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. ज्या जिल्ह्यांतील आरटीईअंतर्गत पात्र असलेल्या शाळांची 100 टक्के नोंदणी पूर्ण होणार नाही, त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी यांची राहील, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी स्पष्ट केले होते. परंतु, अद्याप एकाही शाळेची नोंदणी झाली नसल्याचे उघडकीस आले आहे.

यासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीईची जबाबदारी असलेली एनआयसी संस्था प्रवेशाची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे; तर प्रवेशप्रक्रियेची जबाबदारी असणारे काही अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शाळांची नोंदणी होण्यास वेळ लागणार आहे. परिणामी, विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया 1 फेब्रुवारीऐवजी उशिरा सुरू होईल. त्यामुळे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *