महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २७ जानेवारी । ब्रँड फायनान्स या जगातील आघाडीच्या ब्रँड व्हॅल्युएशन फर्मनुसार, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस ही जागतिक स्तरावर आयटी सेवा क्षेत्रातील दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी ठरली आहे. ब्रँड व्हॅल्युएशन फर्मने सांगितले की इन्फोसिस (Infosys) ही कंपनी या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. यासह, आयटी क्षेत्रातील इतर चार मोठ्या भारतीय कंपन्यांनी टॉप २५ कंपन्यांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
टीसीएस आणि इन्फोसिस सोबतच विप्रो, एचसीएल, टेक महिंद्रा आणि एलटीआय या कंपन्यांचा या लिस्टमध्ये समावेश आहे. या कंपन्या अनुक्रमे सातव्या, आठव्या, पंधराव्या आणि २२व्या स्थानावर आहेत. २०२० ते २०२२ दरम्यान भारतातील आयटी कंपन्यांनी ५१ टक्क्यांनी वाढ केली तर अमेरिकेच्या आयटी कंपन्यांचे ब्रँड सात टक्क्यांनी खाली आले. रिपोर्टनुसार, अमेरिकेची आयबीएम कंपनी चौथ्या स्थानावर आली असून टीसीएस गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी तर २०२०च्या तुलनेत २४ टक्क्यांच्या वाढीसह दुसऱ्या स्थानावर आली आहे. टीसीएसचे ब्रँड मूल्य १६.८ अरब डॉलर आहे.
टीसीएसने शेअर मार्केटला दिलेल्या माहितीत म्हटले आहे, या वाढीचे श्रेय कंपनीच्या ब्रँड आणि कर्मचाऱ्यांमधील गुंतवणूक आणि मजबूत आर्थिक कामगिरीला जाते. कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी राजश्री आर यांनी सांगितले, हे रँकिंग कंपनीसाठी एक मैलाचा दगड आहे. ही रँकिंग कंपनीची बाजारातील वाढती प्रासंगिकता आणि ग्राहकांसाठीचे तिचे नावीन्य आणि बदल यांची पुष्टी करते.
याव्यतिरिक्त या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणारी इन्फोसिस कंपनी जगातील सर्वात वेगाने वाढणारा आयटी सेवा प्रदाता ब्रँड म्हणून उदयास आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या कंपनीची ब्रँड व्हॅल्यू ५२ टक्क्यांनी आणि २०२०च्या तुलनेत ८० टक्क्यांनी वाढून १२.८ अरब डॉलर झाले आहे.