ग्रामीण भागातील प्रवाश्यांचा जीव एसटी बंदमुळे मेटाकुटीला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ जानेवारी । एसटी कामगारांचा विलीनीकरणासाठी राज्यभर सुरु असलेला संप आणि या संपाचा परिणाम शहरी भागासह ग्रामीण भागात अधिक प्रमाणात जाणवत आहे. एसटी महामंडळाची बस ही ग्रामीण भागातील बहुतांश गरीब नागरिकांचा कणा अथवा जीवनवाहिनी आहे. परिणामी ग्रामीण भागातल्या नागरिकांची एसटी (ST) बंदमुळे प्रचंड हेळसांड होत आहे. एसटी प्रवासावरती अवलंबून असणारे प्रवासी खासगी वाहनाने अतिरिक्त पैसे देऊन प्रवास करतानाचे चित्र मावळात आहे.

मावळ (Maval) परिसर हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. तसेच या भागात शेती व शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने दळणवळण मोठ्या प्रमाणात आहे. एसटी हा ग्रामीण भागातून पुणेशहरात येण्या जाण्यासाठी मुख्य साधन आहे.गेले तीन महिन्यांपासून लालापरी बंद असल्याने विद्यार्थी (Students), दूधवाले, फळभाजीपाला विक्रेते यांचे खूप नुकसान होत आहे. तळेगाव, वडगाव मावळ, कान्हे फाटा, टाकवे बुद्रुक, फळणे फाटा, कोंडीवडे, भोयरे यासह पुण्यापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरावरील गावांचा संबंध तळेगाव-वडगाव-लोणावळा या सोबत तुटला आहे.

मावळच्या ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी, कामगार, छोटेमोठे व्यापारी यांचे एसटीच्या माध्यमातून पुणे (Pune), पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad), वडगाव, तळेगाव व लोणावळा या शहरात येणेजाणे असते. ग्रामीण भागामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव ग्रामीण भागातील महिला व नागरिकांना औद्योगिक वसाहत टाकवे बुद्रुक तसेच शहरी भागांमध्ये एमआयडीसी मध्ये काम करण्यासाठी जावे लागते.

एसटी बंदचा (St Strike) सर्वात मोठा फटका महिलांना बसत आहे. ग्रामीण भागात प्रवासाची इतर कुठलीही सुविधा दिसून येत नाही. एसटी संप सुरू असल्यामुळे इतर खाजगी वाहनाने जीव धोक्यात घालून, प्रसंगी जास्तीचे पैसे देऊन नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. या खाजगी वाहनाच्या प्रवासात त्या वाहनांची क्षमता नसताना सुद्धा कोंबड्या-बकऱ्या सारखे प्रवासी नागरिक, महिलांना बसवले जात आहेत.

याकडे वाहतूक पोलिसांचे (Police) जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. परिणामी प्रवासामध्ये महिलांचे अतोनात हाल होत आहे. अपघात (Accident) होऊन एखादी मोठी घटना घडण्याच्या अगोदर याकडे प्रशासनाने लक्ष्य देणे गरजेचे आहे. या जीवघेण्या समस्येकडे अजून तरी कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचे किंवा शासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष्य नाही. उद्या काही अघटित घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा सवाल नागरिक करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *