महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ जानेवारी । गानसम्राज्ञी लता मंगेशकरांना (Lata Mangeshkar) कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल केल्यापासून लता मंगेशकरांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे, अशी माहिती लता दीदींवर उपचार करत असलेल्या डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे.
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतीत समदानी यांनी एबीपीशी संवाद साधताना सांगितले होते की, लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनिया देखील झाला आहे, ज्याला कोविड न्यूमोनिया असेही म्हणतात. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या लता मंगेशकर आयसीयूमध्येच दाखल असून पाच डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) January 27, 2022
92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात ‘प्रभू कुंज’ येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आधीही अनेकदा त्यांनी या रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
काही दिवसांपूर्वी मंगेशकर कुटुंबीयांनी केलेले निवेदन
लता दीदींच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती देणं शक्य नाही. ती गोपनीय बाबतीत थेट घुसखोरी होईल. कृपया प्रकृतीबाबत कोणत्याही त्रासदायक अफवा पसरवू नका.