महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ जानेवारी । मोबाईल युझर्संना या बातमीमुळे नक्कीच आनंद होणार आहे. कारण आपण लवकरच ३० दिवसांची वैधता असणाऱ्या प्रीपेड प्लॅनने रिचार्ज करू शकणार आहात. सर्व टेलिकॉम कंपन्यांसाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) नवीन निर्देश जारी केले आहेत. यामध्ये पूर्ण महिन्याच्या टॅरिफ प्लॅनसह इतर अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ट्रायने असे अनेक निर्णय टेलिकॉम टॅरिफ (६६ वी सुधारणा) ऑर्डर, २०२२ अंतर्गत दिले आहेत, जे ऐकून उपभोक्त्यांना आनंद होईल.
किमान एक टॅरिफ प्लॅन असा असावा, ज्याची वैधता ३० दिवस असेल, असा आदेश ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना दिला आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या एका आदेशात ट्रायने म्हटले आहे, सर्व दूरसंचार कंपन्यांनी एक प्लॅन व्हाउचर, एक विशेष टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर ३० दिवसांच्या वैधतेसह ऑफर केले पाहिजे. जेणेकरून ते प्रत्येक महिन्याच्या एकाच तारखेला रिन्यू केले जाऊ शकतील.
टेलिकॉम टॅरिफ (६६ वी सुधारणा) ऑर्डर, २०२२ जाहीर झाल्यानंतर मोबाईल वापरकर्त्यांना रिचार्ज प्लॅन्सचे अनेक पर्याय उपलब्ध होतील. तसेच त्यांना प्लॅनमध्ये संपूर्ण ३० दिवसांच्या वैधतेचाही पर्याय मिळतील. टेलिकॉम कंपन्या आतापर्यंत २८ आणि २४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन देत होत्या. या कंपन्या पूर्ण महिन्याचा रिचार्ज देत नाहीत अशी ग्राहकांची तक्रार होती. यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. सोबतच जास्त पैसे खर्च होत होते. ग्राहकांकडून ट्रायला अनेक तक्रारी आल्या. यात असे म्हटले आहे, ग्राहकांना मासिक प्लॅनसाठी वर्षातून १३ वेळा रिचार्ज करवा लागतो, यामुळे त्यांना फसवणूक झाल्यासारखे वाटते.
ट्रायनुसार या नवीन बदलांमुळे ग्राहकांना बराच फायदा होईल आणि त्यांना आपल्या सोयीप्रमाणे योग्य वैधतेच्या प्लॅनचे पर्याय उपलब्ध होतील. दरम्यान ट्रायच्या या निर्णयाला टेलिकॉम कंपन्यांनी विरोध केला आहे. २८, २४, ५४ आणि ८४ दिवसांच्या वैधतेच्या कोणत्याही प्लॅनमध्ये बदल केल्यास बिल सायकलमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते. तसेच, प्रत्येक महिन्याच्या एकाच तारखेला एकाच किमतीचा रिचार्ज रिन्यू करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही, कारण ते पोस्टपेड प्लॅन्ससाठी केले जाते, असे टेलिकॉम कंपन्यांचे म्हणणे आहे.