महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ जानेवारी । कोरोनाची तिसरी लाट आणि त्यासोबतच आलेला ओमिक्रॉन सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय ठरला होता. या पार्श्वभूमीवर नव्याने निर्बंध देखील राज्य सरकारकडून लागू करण्यात आले होते. पण, आता एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत घटत होऊ लागल्यामुळे निर्बंध पुन्हा शिथिल करण्याची मागणी होऊ लागली आहे, तर दुसरीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाबाबत राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी माहिती देताना त्यांनी बाधितांची आकडेवारी आणि टक्केवारी देखील सांगितली आहे.
तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू येऊन गेल्याचे म्हणता येईल. बाधितांची संख्या मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी अचानक वाढत होती. ती आता तशी नाही. पण राज्याच्या इतर भागात तसेच ग्रामीण भागातही त्याची संख्या वाढत आहे. पण सर्वजण ५ ते ७ दिवसांच्या उपचारांवर बरे होत असल्यामुळे इतर भागात वाढणारी बाधितांची सख्या याबाबत सध्या चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे राजेश टोपे यावेळी म्हणाले.
दरम्यान, राज्यात कोरोनासाठी तयार करण्यात आलेले ९२ ते ९५ टक्के बेड अद्याप रिक्त असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. फक्त ५ ते ७ टक्केच बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. आयसीयू, ऑक्सिजनवरचे रुग्ण फारतर एक टक्के आहेत. बहुतेक बाधित होम क्वारंटाईन असल्यामुळे टास्क फोर्सने मार्गदर्शन करावे, जे निर्बंध आपण लावले आहेत, ते किती दिवस ठेवायचे, याविषयी मार्गदर्शन मिळाले, तर त्याविषयी लोकांना दिलासा मिळू शकेल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
देशासह राज्यात सध्या ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटची चर्चा सुरू झाली आहे. राजेश टोपे यांनी त्याविषयी देखील भूमिका मांडली आहे. एका नवीन व्हेरिएंटची चर्चा सुरू झाली आहे. तो फार घातक असल्याचे मी ऐकले आहे. त्यावर जागतिक आरोग्य संघटना संशोधन करत आहे. विशेष म्हणजे त्यात मृत्यूदर ३० टक्के असल्याचे सांगितले गेले आहे. तो सध्याच्या ओमिक्रॉन एवढाच वेगाने प्रसार होणारा आहे. वटवाघुळापासूनच याची सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. पण अद्याप यावर जागतिक आरोग्य संघटना अभ्यास करत आहे. त्याचे कोणतेही बाधित नव्याने कुठे आढळलेले नसल्यामुळे अद्याप त्यावर काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचे देखील टोपे यांनी नमूद केले.
दरम्यान, आपण मास्कमुक्त महाराष्ट्र करण्याविषयी कधीच उल्लेख केला नसल्याचे राजेश टोपे म्हणाले. मास्कमुक्त महाराष्ट्र असे आम्ही कधीही म्हटलेले नाही. इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड अशा युरोपातील देशांमध्ये काही निर्णय घेतले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याला त्यातून काही बोध घेता येईल का? आपल्याकडील नियमांबाबत काही बदल करता येतील का? याविषयी आयसीएमआरकडे विचारणा करण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केल्याचे स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिले.