![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० जानेवारी । महाराष्ट्रात मराठवाड्यातही थंडीचा जोर वाढला असून अनेक शहरांचे तापमान १० अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा खाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. परभणीचा पारा शनिवार २९ जानेवारी रोजी ५.६ अंश सेल्सियस घसरल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागात झाली आहे. परभणीचे शनिवार रोजी नोंदवलेले तापमान हे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान आहे.
त्यामुळे शहरात दिवसभर गारवा जाणवत होता. परभणीचे तापमान शुक्रवार रोजी ८ अंश सेल्सियसवर होते. तर गुरुवार दि. २७ जानेवारी रोजी परभणीचा पारा ८.३ अंश सेल्सियसवर होता. दरम्यान, थंडीचा जोर वाढल्यामुळे या तापमानात घट होऊन शनिवार रोजी तापमानात चांगलीच घट झाली आहे. दिवसभर थंडी जाणवत असून परत एकदा सकाळी आणि रात्रीच्या सुमारास बोचऱ्या थंडीचा परभणीकरांना सामना करावा लागतोय. तर थंडीचा जोर वाढल्याने गल्लीबोळात जागोजागी शेकोट्यांचा आधार नागरिक घेत आहेत.
दरम्यान, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवसांत किमान तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. तसेच विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दि. २ ते ८ फेब्रुवारी दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी होते.