महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० जानेवारी । राज्य सरकारने किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी (Wine Allowed To Sell in Supermarkets) दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय देखील झाला. त्यानंतर वाईन ही दारू आहे की नाही? यावरून वाद रंगला आहे. त्यातच वाईन पिऊन गाडी चालवली तर दंड होईल का? असा प्रश्न एकाने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) विचारला. त्यावर पोलिसांनी भन्नाट उत्तर दिलं आहे.
राज्य सरकारने वाईनबाबत निर्णय घेतल्यानंतर विरोधकांनी सडकून टीका केली. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यानंतर वाईन ही दारू नाही, असा दावा राज्यातील नेत्यांनी केला आहे. आता वाईन पिऊन गाडी चालवली तर मला पोलिस पकडणार का? बार दाखवणार की तुरुंग? असा प्रश्न एका नेटकऱ्यानं विचारला. त्यावर ”आम्ही तुम्हाला जबाबदार नागरिक म्हणून मद्यपान केल्यानंतर बारमधून उठून ड्रायव्हर असलेल्या गाडीत बसण्याची शिफारस करतो. जर ब्रेथ अॅनालयाझरमध्ये तुम्ही सेवन केलेल्या वाईनमध्ये अल्कोहोलचा अंश आढळला तर तुम्हाला तुरुंगात आमचा पाहुणा म्हणून यावे लागेल,” असं उत्तर मुंबई पोलिसांनी दिलं आहे.
वाईनला परवानगी दिल्यामुळे महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका करत वाईन म्हणजे दारू नाही, असं म्हटलं. वाइनची विक्री शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. वाइनची विक्री वाढली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं आहे, असं राऊत म्हणाले होते.