70 वर्षांत उभारलेले सर्व विकून खाणे, हेच मोदी सरकारचे धोरण; महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची टीका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ फेब्रुवारी । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत विरोधकांनी कडवट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांच्या मते हा अर्थसंकल्प निरर्थक असून यात शेतकरी व सर्वसामान्यांसाठी काहीच नाही. तर सत्तेच्या बाजूने असलेल्या नेत्यांनी हा अर्थसंकल्प विकासाला चालना देणारा असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तर अर्थसंकल्पावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. ७० वर्षांत उभारलेले सर्व विकून खाणे, हेच मोदी सरकारचे धोरण आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

मोदी सरकारने नेहमीच्या पद्धतीने या बजेटमधून मोठमोठे आकडे फेकून भव्य दिव्य स्वप्ने दाखवली आहेत. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या अर्थसंकल्पाची मांडणी केली आहे. गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही. डिजिटल स्वप्न दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला आहे. सरकारी कंपन्या विकणे, टॅक्स-इंधन दर वाढवणे या व्यक्तरिक्त केंद्र सरकारकडे दुसरे धोरण नाही. मोदी सरकारचे ७ वर्षांत सादर झालेले अर्थसंकल्प फक्त भविष्याची स्वप्न दाखवणारे आहेत. काय केले हे ते सांगत नाहीत.

मुद्रालोन, स्टार्टअप योजना व केलेल्या घोषणांवर ते बोलत नाहीत. मागील अर्थसंकल्पातील घोषणांबाबत सीतारमण यांनी सांगितले नाही. कोरोनात जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना २ लाखापर्यंत मदत होईल, अशी अर्थसंकल्पातून अपेक्षा होती. मात्र अर्थमंत्र्यांनी चकार शब्दही काढला नाही. बेरोजगारी सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.

रोजगार निर्मितीचे स्वप्न दाखवले जात आहे. ६० लाख नोकऱ्या देण्याची घोषणा करून बेरोजगार आणि तरुण मतदारांच्या डोळ्यात धुळफेक केली आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्ग, छोटे व्यापारी, बेरोजगार, विद्यार्थी, महिला, दलित, अल्पसंख्यांक यांना काही मिळाले नाही. निवडक उद्योगपती मित्र वगळता सर्वांची निराशा झाली आहे, असे मंत्री थोरात म्हणाले.

सरकारने खते, कीटकनाशक कारखाने बंद करावेत : विजय जावंधिया : रासायनिक खते व कीटकनाशक मुक्त शेतीवर भर देणे, कृषी आधारित नव्या उद्योगांना कर्ज देणे अशा घोषणा द्यायला चांगल्या वाटतात. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. सरकारला खरेच रासायनिक खते व कीटकनाशक मुक्त शेतीवर भर द्यायचा असेल तर सरकारने रासायनिक खते व कीटकनाशकांचे कारखाने बंद करावेत.

कॉर्पोरेट सेक्टरला खूष करण्याचा प्रयत्न ॲड. आंबेडकर : बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने काहीच केले नाही. सर्वसामान्य व कामगारांसाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही. नियोजनशून्य बजेट आहे. शेतकऱ्यांसाठी ठोस असे काही नाही. कॉर्पोरेट सेक्टरला खूष करण्याचा या अर्थसंकल्पात प्रयत्न केला. पण ते फार काळ टिकणार नाही. नवीन रोजगार निर्माण करणारे कुठलेही उद्योगविषयक घोषणा नाही.

नव्या भारताची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प : नितीन गडकरी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेले अंदाजपत्रक देशातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या वाढीला गती देणारे आहे. हे अंदाजपत्रक भारतीयांचे जीवन अधिक सुसह्य करणारे असून नव्या भारताची पायाभरणी करणारे आहे.

देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास आवश्यक आहे. महामार्ग, रेल्वे, वीज, आरोग्य, शिक्षण व शेतीशी संबंधित महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांवर करण्यात येत असलेली गुंतवणूक ही मैलाचा दगड असल्याचे सिद्ध होईल. रस्ते परिवहन मास्टर प्लॅनला अंतिम रुप देण्यासोबतच शहरी भागात सार्वजनिक वाहतूक- परिवहनमध्ये येणाऱ्या बदलाला गती देणे, शून्य इंधन धोरणाच्या निर्णयामुळे शहरी क्षेत्राला विशेष गती मिळेल.

२५ हजार किमी रस्ते बांधकाम पूर्ण करण्यासोबतच प्रदूषण रोखण्यासाठी अनेक शहरांमध्ये ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या योजनेचे स्वागत आहे. शहरांमध्ये बॅटरी अदलाबदल करण्याच्या धोरणावर भर दिला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *