महाराष्ट्र २४- ऑनलाईन – नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आर्थिक वर्षात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी नवी दिल्ली येथे आरबीआयच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आर्थिक वर्ष 2021-2022ची सुरूवात आता 1 एप्रिल रोजी होणार आहे. आर्थिक वर्ष 2019-2020 आता चालू वर्षात 30 जून 2020 रोजी संपुष्टात येणार आहे, तर आर्थिक वर्ष 2020-2021ची सुरुवात 1 जुलै रोजी होईल. मात्र, हे वर्ष 31 मार्च 2021 रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर पुढील सर्व आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलपासूनच होणार आहे.
सध्यापुरते आरबीआय आणि सरकार टी प्लस 1 पद्धतीचा अवलंब करतात. म्हणजे आर्थिक वर्ष सलग दोन वर्षांत विभागले जातात. मात्र, यामध्ये एक मूलभूत फरक असतो. सरकारचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल रोजी म्हणजे ‘टी’ला (पहिले वर्ष) सुरू होते. तर मार्च 31ला टी प्लस 1ला (दुसरे वर्ष) संपते. तर आरबीआयसाठी पहिले वर्ष 1 जुलैला सुरू होते आणि पुढील वर्षात ते 30 जून रोजी संपते.