महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ फेब्रुवारी । भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आहे. कणकवली दिवाणी न्यायालायने हा निर्णय दिला आहे.
सरकारी वकीलांनी नितेश राणे यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास अहवाल कोर्टात सादर केला. नितेश राणे यांचा थेट सहभाग गुन्ह्यात आहे, असं म्हणणं पोलिसांनी मांडलं आहे. ज्या पीएच्या फोनवरुन फोन केले होते, त्या पीएलादेखील अटक केली असून दोघांना समोरा-समोर बसवून चौकशी करायची आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे.यानंतर न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना दोन दिवसांची म्हणजे ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कणकवली दिवाणी न्यायालयाबाहेर नितेश राणे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणाव जमले आहेत.
त्याआधी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी जामीन अर्जासाठी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. पण आज त्यांनी हा अर्ज मागे घेतला.
त्यानंतर नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग तपास अधिकाऱ्यांकडे शरणागती पत्करली. त्यानंतर ते कणकवली दिवाणी न्यायालयात दाखल झाले.
चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार असल्याचं नितेश राणे यांचे वकील अॅड. सतिश मानेशिंदे यांनी सांगितलं. नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या संरक्षणामध्ये पाच दिवस शिल्लक असतानाही तपास अधिकाऱ्यासमोर शरण जात असल्याचं सांगत हायकोर्टातील जामीन अर्ज मागे घेतला आहे अशी माहिती अॅड सतिश मानेशिंदे यांनी दिली.
न्यायालयाच्या निर्णयाचा आदर
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जात असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं, आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने राज्य सरकारने मला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण मी आज स्वत:हून न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जात असल्याची प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली.