महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ फेब्रुवारी । महाराष्ट्र सरकारने नुकतीच सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र या निर्णयानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. यावरुन राजकारण तापलेले दिसत आहे. विरोधकांनी तर या विषय लावून धरला आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी यावर भाष्य केले होते. राज्य सरकारच्या निर्णयाला होत असलेला विरोध हा चिंतेचा विषय नाही, मात्र निर्णय बदलला तरी वाईट वाटण्याचे कारण नाही असे म्हटले होते. आता यावरुन विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
याविषयावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘मला वाटतेय की, निर्णय चुकला आहे हे शरद पवारांच्या देखील लक्षात आले आहे. समाजाच्या सर्व स्तरातून या निर्णयाला विरोध होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. या निर्णयामुळे सरकारची अब्रू जात आहे. जे काही डीलिंग करून या सरकारने काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यातून हे सरकार एक्स्पोज झालं आहे. त्यामुळे या सरकारला हा निर्णय मागे घ्यावाच लागणार आहे. हे पवारांच्याही लक्षात आले आहे. यामुळे त्यांनी सरकारला एक प्रकारे सुधरा असा सल्ला दिला आहे. तसेच सरकारमध्ये शहानपण असेल तर त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा आम्ही जनतेमध्ये जातोय, सर्व स्तरातून या निर्णयाचा विरोध केला जात आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
‘राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाही. सरकारच्या निर्णयाला जर अनेक स्तरातून विरोध केला जात असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही. ‘