महाराष्ट्र 24- पिंपरी-चिंचवड ; सध्या जगभर कोविड 19 या रोगाने थैमान घातले आहे. या कोरोना व्हायरसचा प्रसार झपाटयाने होत असल्यामुळे केंद्रासह राज्यसरकारने खबरदारीचा उपाय म्हणून जनता कर्फ्यू तसेच राज्यराज्यात लॉक डाऊन केल्यामुळे शहरासह राज्यभरातील उद्योजकांना सर्व कंपन्या, लघु उद्योग सरकारच्या सुचनेमुळे बंद ठेवाव्या लागल्या आहेत.
परिणामी व्यापारी वर्गाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष 2019-20 चे जीएसटी, आयकर भरणा मुदतवाढ मिळावी यासाठी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा उद्योजक प्रदीप गायकवाड यांनी 22 मार्च रोजी दिलेल्या निवेदनाला तात्काळ यश मिळाले आहे. राज्य सरकारने 24 मार्च रोजीच या संदर्भात अध्यादेश काढला असून आता 31 मार्च ऐवजी 31 जून पर्यंत ही मुदतवाढ मिळाली आहे.
उद्योजक गायकवाड यांनी या संदर्भातील निवेदनाची प्रत केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन , राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे यांना 22 मार्च रोजी देण्यात आली होती.
विशेष बाब म्हणजे गायकवाड यांनी 1 महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. मात्र सरकारने 2 महिन्यांची मुदतवाढ दिल्यामुळे व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. तर गायकवाड यांचे व्यापारी वर्गातून आभार मानले जात आहेत.