पुण्यात अचानक बंद केला उड्डाणपूल; वाहनांच्या तब्बल ५ किमीपर्यंत लागल्या रांगा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ फेब्रुवारी । तज्ञांनी आज दुपारी हडपसर उड्डाणपुलाची पाहणी केल्यानंतर महापालिकेने अचानक दोन्ही बाजूचा उड्डाणपूल सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला. याबाबत वाहतूक विभागाला कसलीही माहिती देण्यात आली नव्हती. परिणामी पुणे-सोलापूर रोड आणि सोलापूर-पुणे रोड (Pune Solapur Highway) या दोन्ही दिशेच्या मार्गाला वाहनांच्या तब्बल पाच ते सात किलोमीटर अंतरापर्यंत रांगा लागल्या आहेत. (Pune Traffic Jam)

अचानक उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहनचालक दोन तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी हडपसर वाहतूक पोलीस युद्ध पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

हडपसर वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांनी या गोंधळाबाबत माहिती दिली आहे. झेंडे यांनी सांगितलं की, हडपसर उड्डाणपूल जड वाहनासाठी आम्ही बंद केला होता, मात्र अचानक महापालिकेच्या पथकाने उड्डाणपूलाची पाहणी करून पूर्ण उड्डाणपूल सर्वच वाहनांसाठी बंद केला आहे. त्यामुळे चहूबाजूला कोंडी झाली आहे, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, महापालिकेने अचानक उड्डाणपूल बंद केल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप झाला असून ही कोंडी लवकरात लवकर फोडावी, अशी मागणी या वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *