Weather Update: देशाच्या राजधानीत दाट धुके; महाबळेश्वरचा पारा 5 अंशावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ फेब्रुवारी । गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. देशाची राजधानी दिल्लीत दाट धुके पडले आहे. पुढील दोन ते तीन दिवस दिल्लीत दाट धुके राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर दिल्लीसह उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्येही दाट धुके पडले आहे. या सर्व राज्यात पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. श्रीनगरमधील वाढती थंडी पाहता आज येथील तापमान शून्य अंशांपर्यंत खाली येऊ शकते. तर कमाल तापमान हे 6 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचा पारा आज अचानक 5 अंशावर आल्याने अनेक भागात दवबिंदू गोठले आहे. तर वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. वेण्णा लेक परिसरात ज्या ठिकाणी बोट उभ्या केल्या जातात, त्या ठिकाणी आणि गाड्यांच्या टापांवर दवबिंदू गोठल्याचे पहायला मिळाले. अचानक घसरलेल्या तापमानाचा आनंद मात्र महाबळेश्वरमधील पर्यटक घेताना दिसत आहेत.

धुळे जिल्ह्याच्या तापमानात देखील पुन्हा घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यातील किमान तापमान 5.5 अंशावर गेल्याने गारठा वाढला आहे. नाशिक आणि निफाडचा पारा पुन्हा घसरला आहे. निफाडचे तपमान 5.5 अंशावर गेले आहे तर नाशिकचे तपमान 8.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. निफाड 3 तर नाशिकचा पारा 4 अंशाने घसरला आहे. दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर-पश्चिम राजस्थानवर चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरच्या पर्वतांवर बर्फवृष्टी सुरू आहे. या गडबडीमुळे दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाबच्या मैदानी भागात जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये सर्व राज्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आजही दिल्लीत ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. वाढत्या थंडीमुळे लोकांमध्ये चांगलीच हुडहुडी भरली आहे. राजस्थामध्ये तापमानाचा पारा घसरला आहे. त्या ठिकाणी 14 अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे. राजस्थानमध्ये जरी थंडीचा जोर वाढला असला तरी पाऊस पडणार नसल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जयपूरमध्ये आकाश निरभ्र राहणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. तसेच अनेक ठिकाणी बर्षवृष्टी देखील होत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात होत आहे. राज्यात देखील काही ठिकाणी गारठा चांगलाच वाढला आहे. राज्यात पुणे, सातारा, सांगलीसह नाशिक, उस्मानाबाद याठिकाणी तापमानाचा पार चांगलाच घसरला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी लोक शेकोट्या पेटवताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *