आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली; उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ फेब्रुवारी । संतोष परब हल्लाप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांची प्रकृती रात्री उशिरा काहीशी बिघडल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नितेश राणेंची तब्येत बिघल्याची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली आहे. पण नितेश राणे पोलिस कोठडीत असल्यामुळे त्यांना भेटण्याची कुणालाही परवानगी नाही. त्यामुळे आता नारायण राणे यांना पोलिस भेटू देणार का हे पाहावे लागेल. नितेश राणे यांची प्रकृती आधीपासूनच बरी नसल्याची माहिती मिळत आहे.

सावंतवाडी कारागृहात न ठेवता नितेश राणे यांना रुग्णालयात ठेवण्यात यावे, अशी मागणी नितेश राणे यांच्या वकिलांनी शुक्रवारी न्यायालयात केली होती. नितेश राणे यांच्या वकिलांनी कणकवली दिवाणी न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर सावंतवाडी कारागृह अधीक्षकांकडे यासंबंधीचा अर्ज दिला होता. नितेश राणे यांची प्रकृती आधीपासूनच बरी नव्हती. याबाबत त्यांनी न्यायालयाला कळविल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर नितेश राणे यांना कारागृहाऐवजी जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले. रात्री उशिरा त्यांची प्रकृती काहीशी बिघडल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे हे देखील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.

कणकवली न्यायालयाने शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्लाप्रकरणी सुरुवातीला नितेश राणे यांना चार फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पण त्यानंतर शुक्रवारी पुन्हा यावर सुनावणी झाली असून, त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर धडधाकड असणारे आमदार नितेश राणे यांची तब्येत काहीच क्षणात कशी काय बिघडते?, असा सवाल आमदार दीपक केसरकर यांनी उपस्थित केला होता.

रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टर देखील ते आजारी असल्याचे सर्टिफिकेट देतात. असे होत असेल, तर लोकांमधील भीती कमी होऊन, कोणीही कायदा हातात घेऊ शकतो. आपण यापूर्वी गृह राज्यमंत्री असताना त्यांनी असाच बनाव केला होता. त्यावेळी त्याची मी पुन्हा एकदा तपासणी करुन त्यांना कोठडीत पाठवले होते. परंतु यावेळी असे काहीच झाले नाही. त्यांची खरीच तब्ब्येत बिघडली आहे का, याची खातरजमा करणे आवश्यक होते. पण तसे काहीच झाले नाही, असे आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी नितेश राणे यांच्या पोलिस कोठडीत कणकवली सत्र न्यायालयाने 18 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे. तब्येत बिघडल्यानंतर नितेश राणे यांना देखील रुग्णालयातच ठेवण्यात यावे, अशी मागणी नितेश राणे यांच्या वकिलांची केली होती. ही मान्य झाल्यानंतर नितेश राणे यांना शुक्रवारी रात्री जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. पण त्यांची तब्येत रात्री बिघडली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *