जगातील सर्वात मोठं ‘इग्लू रेस्टॉरंट’, पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र, तुम्ही पाहिलं का?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ७ फेब्रुवारी । गुलमर्गच्या जगप्रसिद्ध स्की रिसॉर्ट देशभरातील पर्यटकांना आकर्षित करत असते. आता तिथेच एका हॉटेल व्यावसायिकाने काश्मीरच्या सौंदर्यात भर टाकली आहे असं म्हणावं लागेल. कोरोनामुळे पर्यटकांची कमी होत चाललेली संख्या पाहता, हॉटेल व्यावसायिकाने पर्यटक आणि स्थानिकांना आकर्षित करण्यासाठी एक मोठे ‘इग्लू रेस्टॉरंट’ (Igloo Restaurant) तयार केले आहे.

इग्लू रेस्टॉरंट बनवणाऱ्या हॉटेलचे मालक सय्यद वसीम शाह यांनी दावा केला आहे की, त्यांनी बनवलेले हे इग्लू रेस्टॉरंट जगातील सर्वात मोठे रेस्टॉरंट आहे. त्याची उंची 37.5 फूट आणि व्यास 44.5 फूट असल्याचे वसीम सांगतात. त्यांनी सांगितले की, लवकरच गिनीज बुकची टीम येथे येईल आणि दाव्यांची पडताळणी करेल.

वसीम यांनी पुढे सांगितले की, जगातील सर्वात मोठा इग्लू 2016 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये बांधण्यात आला होता. त्याची उंची 33.8 फूट आणि व्यास 42.4 फूट होता. त्यामुळे त्यांनी बांधलेला इग्लू नक्कीच जगातील सर्वात मोठा आहे. पण सर्वात मोठा इग्लू असल्याचा दावा सिद्ध होण्याची वाट न पाहता पर्यटकांनी आधीच याला पसंती दर्शवली आहे. बर्फाच्छादित गुलमर्गमधील ‘इग्लू रेस्टॉरंट’ सध्या पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.

इग्लू बनवण्यासाठी लागले 64 दिवस
इग्लू बनवणे सोपे काम नव्हते. हे बनवण्यासाठी सुमारे 30 लोकांच्या टीमला सुमारे 64 दिवस लागले. या टीमने अनेक दिवस दोन शिफ्टमध्ये काम केले. यामध्ये स्नो आर्ट, टेबल आणि खुर्च्या बनवण्याचा देखील समावेश होता, ज्यासाठी खूप मेहनत लागली.

सुमारे 40 लोकांच्या बसण्याची सोय
गेल्या वर्षीही वसीम यांनी गुलमर्गमध्ये एक इग्लू रेस्टॉरंट डिझाईन केले होते, परंतु ते खूपच लहान होते, फक्त 4 टेबल आणि 16 लोक बसू शकत होते. मात्र आता बनवण्यात आलेले इग्लू मोठे असून यामध्ये दोन भाग आहेत. पहिल्या भागात, एक सेल्फी पॉईंट आणि दुसऱ्या भागात 10 टेबल असलेले एक रेस्टॉरंट, ज्यामध्ये 40 लोक सहज बसू शकतात.

स्थानिक लोक आणि पर्यटक इग्लू पाहण्याचा आनंद घेण्यासह त्यांना इग्लूच्या आतमधील चविष्ट जेवणाचाही आस्वाद घेत आहेत. मात्र, थंडी फार काळ टिकणार नसल्याने इग्लूही फार काळ टिकणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *