महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ फेब्रुवारी । दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील ७ ते १४ तारखेपर्यंतचा आठवडा `व्हॅलेंटाईन वीक` (valentines week) म्हणजेच प्रेमाचा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. हा आठवडा प्रेमीयुगुल आणि तरुणाईसाठी एक प्रकारे मोठा उत्सवच ठरतो. या काळात आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब (Rose), चॉकलेट, भेटवस्तू आणि इतर अनेक गोष्टी देऊन प्रेम व्यक्त (Love feelings) केले जाते. यंदा व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात सोमवारपासून झाली आणि पहिल्याच दिवशी ”व्हॅलेंटाइन वीक” साजरा करण्याचा प्लॅन केलेल्या प्रेमवीरांच्या खिशाला महागाईची झळ बसल्याचे समोर आले.
व्हॅलेंटाईन वीकमुळे गुलाबांच्या मागणीत वाढ झाली असून, सध्या ठाणे शहरात लाल गुलाबाची फुले प्रतिनग २० ते २५ रुपये, तर इतर रंगाची गुलाबाची फुले ३० रुपयांपर्यंत विकली जात आहेत. गुलाबाचे फूल हे इतर फुलांच्या तुलनेत सुगंधी आणि आकर्षक असल्याने मनातील प्रेमाची ”नाजूक” भावना व्यक्त करण्यासाठी ती हमखास प्रेमीयुगुलांकडून खरेदी केली जातात. मागील वर्षी कोरोनामुळे कॉलेज कट्टे, लोकल, बस सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने व्हेलेंटाईन वीकमध्येही गुलाबाच्या फुलांना हवी तशी मागणी मिळाली नव्हती. त्यामुळे गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन वीकदरम्यान लाल गुलाबाची फुले १० ते १५ रुपये, तर इतर रंगाची गुलाब फुले २० ते २५ रुपयांपर्यंत विकली जात होती; परंतु यंदा कॉलेज कट्टे, लोकल, पर्यटनस्थळे आदी सर्व ठिकाणे सुरू झाली असून व्हॅलेंटाईन वीकमध्ये गुलाबाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.