महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ फेब्रुवारी । वाहनमालकांना वाहन तंदुरुस्ती चाचणी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी ‘आरटीओ’ने उपलब्ध ‘ऑनलाईन स्लॉट’ (कालावधी) मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दिवसाकाठी ३०५ ऐवजी ३५५ वाहनांची तंदुरुस्ती चाचणी करता येणार आहे.
कोरोना काळात ही प्रक्रिया थंडावली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने तपासण्या प्रलंबित राहिल्या होत्या. त्यामुळे चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. प्रलंबित चाचण्या निपटारा करण्याच्या हेतूने मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
आरटीओ अधिकारी भरत कळसकर यांनी पक्क्या वाहन लायसन्ससाठी ऑनलाईन स्लॉट बुकिंगमध्ये वाढ केली होती. शिवाय त्यात मुदत संपणाऱ्या शिकाऊ लायसन्सधारकांना प्राधान्य देण्यात आली होती.
या निर्णयामुळे प्रतीक्षा यादी कमी होणार आहे. काळी-पिवळी टॅक्सी आणि परमिट लागू नसलेले तीन टनाहून कमी क्षमता असलेल्या वाहनांची तपासणी ताडदेव कार्यालयातील चाचणी पथावर करण्यात येईल; तर परमिट असलेल्या आणि तीन टनांहून अधिक क्षमता असलेल्या वाहनांची तपासणी बेस्टच्या आणिक आगारातील पथावर करण्यात येईल.