महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ फेब्रुवारी । बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार हा आहे. सोशल मीडियावर अक्षय कुमार हा कायमच सक्रिय असतो. अनेकदा तो सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या ‘बच्चन पांडे’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे अक्षय कुमार हा चर्चेत आहे. नुकताच कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ च्या शो मध्ये अक्षय कुमारने प्रमोशनसाठी नकार दिल्याची माहिती समोर येत आहे.
‘कपिल शर्मा शो’ ला छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणून ओळखले जाते. या शोचा सूत्रसंचालक कपिल शर्माचे विनोद ऐकून सर्वांना हसू अनावर होते. अनेक कलाकार या शोमध्ये त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावत असतात. पण आपल्या आगामी चित्रपटासाठी कपिल शर्मा शो मध्ये येण्यास अक्षय कुमारने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे अक्षय कुमार आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांच्यात काहीतरी बिनसल्याचे बोलले जात आहे. पण आतापर्यंत कपिल शर्मा किंवा त्याच्या जवळच्या कोणत्याही सूत्राने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
यासंदर्भात हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमार आपल्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा शो मध्ये आला होता. त्यावेळी कपिल शर्माने अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता अक्षयची खिल्ली उडवली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अक्षय कुमार हा कपिल शर्मा आणि त्याच्या संपूर्ण टीमवर या संपूर्ण घटनेमुळे नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच या घडलेल्या प्रकाराचा अक्षय कुमारला प्रचंड राग आला आणि कपिल शर्माने त्याचा विश्वास तोडला असल्याचेही वृत्त समोर येत आहे. पण, या वृत्तावर कपिल शर्माकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
१८ मार्चला अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार असून अभिनेत्री क्रिती सेनॉन त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच अर्शद वारसी, जॅकलीन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी ही कलाकारमंडळीदेखील महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. फरहाद सामजी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.