महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ फेब्रुवारी । गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाच्या दु:खातून देश अजून बाहेरही पडलेला नाही तोपर्यंत आता मनोरंजन विश्वातून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. बीआर चोप्रा यांच्या महाभारतात भीमची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. प्रवीण कुमार सोबती हे अनेक दिवसांपासून आजार आणि आर्थिक संकटाशी झुंज देत होते. त्यांनी आपल्या मजबूत शरीरयष्टीच्या जोरावर एक खेळाडू म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
‘महाभारत’ (Mahabharat) या टीव्ही मालिकेने अनेक पिढ्यांना आकर्षित केलं आहे. दूरदर्शनवरील ही एक प्रचंड लोकप्रिय मालिका होती. आजही लोक या मालिकेविषयी तितक्याच उत्सुकतेने बोलतात. नुकताच लॉकडाऊनमध्ये या मालिकेचं पुनःप्रसारान झालं आणि या मालिकेतील सर्व कलाकार पुन्हा एकदा प्रकाशात आले. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला एक खास ओळख मिळाली होती. ही ओळख आजही कायम आहे. परंतु मालिकेतील भीम म्हणजेच अभिनेता प्रवीण कुमार सोबती हे फारच हलाखीचं आयुष्य जगत होते.
पूर्वी दूरदर्शनवर अनेक मालिका प्रसारित होत होत्या. त्याकाळी मनोरंजनाची फार थोडी साधने उपलब्ध होती. त्यामुळे सर्व लोक मालिका पाहून आपलं मनोरंजन करत असत. अशातच दूरदर्शनवर एक मालिका पाहायला मिळत होती. ती मालिका म्हणजे ‘महाभारत’ होय. पौराणिक कथा आणि दमदार कलाकार यामुळे ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्याकाळी घरोघरी टीव्ही नव्हत्या. त्यामुळे ज्या घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी टीव्ही आहे, तिथे ही मालिका पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत असे. अनेक लोक उभं राहून संपूर्ण मालिका पाहत असत. ही जवळजवळ 30 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये पुन्हा ही मालिका टीव्हीवर दाखवण्यात आली होती. त्यामुळे या मालिकेच्या कलाकारांची प्रचंड चर्चा झाली होती. यातील अनेक कलाकार आज या जगात नाहीत. तर आता आणखी एका कलाकाराने या जगाचा निरोप घेतला आहे. ते दुसरे कोणी नसून महारातातील भीम अर्थातच प्रवीण कुमार सोबती आहेत.
या मालिकेत ‘भीम’च पात्रदेखील प्रचंड लोकप्रिय झालं होतं. या मालिकेचं नाव काढताच प्रत्येक व्यक्तीच्या समोर गदाधारी भीम उभा राहतो. ही भूमिका साकारणारे प्रवीण कुमार सोबती यांनी आज 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.त्याकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असणारे प्रवीण आज अत्यंत हलाखीचं जीवन जगत होते. प्रवीण हे बऱ्याच वर्षांपासून घरी बसून होते. या वयात काम करू शकत नसल्याने त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. जवळच्या सर्व नातेवाईकांनी आपली साथ सोडल्याचं त्यांनी सांगितलं होतं. सध्या त्यांची पत्नी त्यांची काळजी घेत होती. त्यांना एक मुलगी आहे, तिचं लग्न झालं आहे. ते आपल्या पत्नीसोबत आर्थिक अडचणींना तोंड देत होते.
अमृतसर पंजाबमध्ये जन्मलेल्या प्रवीण यांच्यात सुरुवातीपासूनच खिलाडूवृत्ती होती. त्यांनी शालेय वयापासूनच अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि त्या स्पर्धा जिंकल्यासुद्धा होत्या. इतकंच नव्हे तर 1966 मध्ये कॉमन वेल्थ स्पर्धेत सिल्वर मेडल जिंकलं होतं. त्यांनतर एशियन स्पर्धेत दोन वेळा गोल्ड मेडल पटकावलं होतं. इतकं सर्व असूनही आज ते इतक्या वाईट अवस्थेत जगत होते. त्यांनी शासनावर आपली नाराजी व्यक्त केली होती. आजपर्यँत पंजाबमध्ये अनेक शासन येऊन गेले, मात्र त्यांना कोणीही पेन्शन दिली नाही. सर्वात उत्तम कामगिरी करून आणि मेडल जिंकूनही त्यांना पेन्शनसारखी सुविधा देण्यात आलेली नाही. सध्या त्यांना BSF ची पेन्शन मिळत होती. मात्र ही पेन्शन त्यांना पुरेसी होत नव्हती .