महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ फेब्रुवारी । पाचोड : दावरवाडी (ता. पैठण) येथील एका शेतकऱ्याच्या खात्यावर सहा महिन्यांआधी तब्बल १५ लाख ३४ हजार ६२४ रुपये जमा झाले. ही रक्कम जमा होताच शेतकऱ्याला पंतप्रधानांची घोषणा आठवली अन् पैसे जनधन खात्याचे असतील, असे समजून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला! त्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले अन् या रकमेतून टुमदार घरही बांधले! मात्र, तब्बल सहा महिन्यानंतर या शेतकऱ्याच्या खात्यात आलेली रक्कम ही ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगाची असल्याचे बॅंकेच्या लक्षात आले. आता बॅंकेने ही रक्कम भरण्यासाठीचे पत्र शेतकऱ्याला पाठविले आहे. मात्र, एवढे पैसे कुठून देणार, असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. याबाबत बॅंक तसेच तालुका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी ः दावरवाडी येथील ज्ञानेश्वर जनार्दन औटे या शेतकऱ्याकडे दोन एकर कोरडवाहू शेती आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते आपली उपजीविका भागवितात. सहा महिन्याआधी १७ ऑगस्ट २०२१ रोजी या शेतकऱ्याच्या खात्यात तब्बल १५ लाख ३४ हजार ६२४ रुपये एवढी रक्कम जमा झाली. याबाबत त्यांना मोबाईलवर संदेश आला. त्यांनी बँकेत जाऊन पासबूकवर रितसर नोंदही करून आणली. ही जमा झालेली रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणापूर्तीची असावी, असा श्री. औटे यांचा समज झाला.
त्यांनी काही दिवस खात्यावरून पैसे न काढता पंतप्रधान कार्यालयाला जनधन खात्यावर आपण सांगितल्याप्रमाणे पंधरा लाख रुपये पाठविल्याबद्दल आभार व्यक्त करणारे पत्र पाठविले. त्यानंतर श्री.औटे यांनी सदर रकमेपैकी टप्प्याटप्प्याने ९,०७,००० रुपये (नऊ लाख सात हजार रुपये) काढले. चांगले घर नसल्याने या रकमेतून चांगले घर बांधावे म्हणून घराचे काम सुरु केले आणि आपले स्वप्नही पूर्णही केले. आता स्वतःचे पक्के घर झाल्याने शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण तो काही दिवसच टिकला. पाच महिन्यानंतर २२ डिसेंबररोजी बॅंकेच्या व्यवस्थापकांनी खात्यातील शिल्लक रक्कम ‘होल्ड’ केली. तसेच सदर रक्कम शेतकऱ्याची नसून ती पिंपळवाडी (ता.पैठण) ग्रामपंचायतीसाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेने पाठविलेली होती. चुकून ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा झाल्याचे बॅंकेने सदर शेतकऱ्याला कळविले. यापैकी काही रक्कम आपण खर्च केली असून ही सर्व रक्कम त्वरित परत करावी, असे लेखी पत्रच बॅंकेने ता. चार फेब्रुवारीला दिले. हे पत्र मिळताच श्री. औटे कुटुंबीयांची झोप उडाली असून आता नऊ लाख २७ हजार रुपये कोठून भरायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.