तुळजाभवानी मंदिरासाठी 200 कोटींचा आराखडा; आता एकाच वेळी थांबू शकतील 1 लाख भाविक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ फेब्रुवारी । कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील मंदिरात लवकरच विकासात्मक बदल करण्यात येणार आहेत. तीर्थक्षेत्र जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या धर्तीवर मंदिराचा विकास आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या नियमानुसार नामिकासूचीतील वास्तुविषारदामार्फत आराखडा तयार करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

अंदाजे २०० कोटींवर असलेल्या विकास आराखड्यात दर्शन मंडप, स्कायवॉक, अभिषेक हॉलसह विविध विकासकामांचा समावेश आहे. मंदिरात एकाचवेळी १ लाख भाविकांना थांबता येईल, एवढ्या क्षमतेच्या दर्शन मंडपासह मंदिराबाहेर पडण्यासाठी तीन मार्ग नव्या आराखड्यात असतील.

पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ.तेजस गेर्गे यांनी यासंदर्भात मंदिर प्रशासनाला २४ डिसेंबर २०२१ रोजी पत्र पाठवून दीर्घकालीन उपाययोजना व व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्वसमावेश साइट मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार आता तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने नामिकासूचीतील वास्तुविशारदांमार्फत मंदिराच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय नुकताच घेतला असून, त्यानुसार प्लॅनचे काम लवकरच सुरू होईल. त्यानंतर मंदिरातील विकासकामांना सुरुवात होणार आहे.

स्कायवॉकने मंदिर परिसरातील गर्दी नियंत्रित करणार; घाटशीळ परिसरात दोन मजली हायड्रोलिक पार्किंग
खडकांच्या नमुन्यांचा अभ्यास करून बांधकामासाठी कोणत्या प्रकारचे सिमेंट, स्टीलचा वापर करता येईल, याविषयी तज्ज्ञांचे मत विचारात घेतले. मात्र, त्यात पुरातत्त्व विभागाच्या नियमांचा अडसर अपेक्षित होता. त्यामुळे पुरातत्त्वीय आराखड्यानुसार कामे करावी लागणार आहेत.

भाविकांकडून मिळणार मोठा निधी

विकासकामांसाठी बहुतांश भाविकांनी निधी देण्याचे मान्य केले आहे. अनेकांनी मंदिर प्रशासनाकडे तशी इच्छा व्यक्त केली आहे. मंदिराकडे सध्या सव्वाशे कोटी रुपये शिल्लक आहेत. यातूनच विकासकामांची सुरुवात होईल. उर्वरित कामांसाठी भाविकांकडून मदत घेतली जाईल, असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गर्दीसोबत सुविधांमध्येही वाढ अपेक्षित
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. दरवर्षी वाढणाऱ्या गर्दीसोबत सुविधांमध्येही वाढ अपेक्षित आहे. त्यासाठी मंदिर प्रशासनाने यापूर्वी वेळाेवेळी ठराव घेऊन सुधारणांसाठी विकासकामांना मंजुरी दिली आहे. -कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी, अध्यक्ष, तुळजाभवानी मंदिर संस्थान

चार मजली असेल इमारत
मंदिराच्या पाठीमागील भागात असलेल्या आराधवाडीलगतच्या छत्रपती राजाराम प्रांगण व छत्रपती संभाजी महाराज प्रांगणात दोन दर्शन मंडपांची उभारणी होईल. या चार मजली इमारतीमध्ये दोन मजले अभिषेक रांग, एका मजल्यावर आराध्य रूम व एका मजल्यावर वाहिक वस्तू ठेवण्यासाठीची व्यवस्था केली जाईल.

स्कायवॉक

800 मीटरचा स्कायवॉक घाटशीळ ते जुना दर्शनमंडप 03 स्कायवॉक मंदिर परिसरात 114 कोटींच्या विकासकामांना 2 वर्षांपूर्वी मंजुरी 200 कोटींचा नियोजित विकास आराखडा तयार 01 लाख भाविक थांबू शकतील एवढा मोठा मंडप

सध्या घाटशीळ भागात नवरात्रोत्सव काळात तात्पुरता दर्शन मंडप उभारला जातो. मात्र, नव्या विकास आराखड्यानुसार तिथे कायमस्वरूपी दर्शन मंडप उभारला जाणार असून या दर्शन मंडपातून स्कायवॉकच्या मार्गाने भाविकांना जुन्या दर्शन मंडपात थेट चौथ्या मजल्यापर्यंत सोडले जाणार आहे. तसेच या भागात दोन मजली पार्किंग केली जाणार आहे. हायड्रोलिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या या पार्किंगमुळे एकाचवेळी अनेक वाहने उभी राहू शकतात. घाटशीळ पार्किंग येथे दर्शन मंडपाची २ मजली इमारत प्रस्तावित आहे. या इमारतीत ३० हजार भाविकांना थांबता येईल. तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन रांगा तयार असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *