महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ फेब्रुवारी । शहरातील नैसर्गिक नदी, नाले, ओढे, तळे या जलस्त्रोताच्या बाजूने किंवा रस्ता, पदपथ किंवा मोकळ्या खासगी, शासकीय जागेवर राडारोडा टाकल्याचे आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दखल करण्यात येणार आहे. अन्यथा राडारोडा उचलण्यासाठीच्या वाहतुक खर्चाच्या दहापट रक्कम दंड म्हणून वसुल करण्यात येईल, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.
महापालिका अधिनियमानुसार शहरात निर्माण होणारा बांधकाम साहित्याचा राडारोडा गोळा करून वाहतूक करण्यासाठी महापालिकेने एस.एस.एन.एनव्हेटीव्ह इन्फ्रा. एल.एल.पी. यांची नेमणूक केली आहे. बांधकाम राडारोडाच्या कचरा निर्माण करणाऱ्यांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सर्व नागरिक, विविध बांधकाम संस्था, खासगी व शासकीय कामाचे ठेकेदार यांनी याबाबत अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.
राडारोडा उचलण्यासाठी कॉल करा
शहरात इतरत्र कोठेही राडारोडा न टाकता , तो उचलण्यासाठी १८००१२०३३२१२६ टोल फ्री क्रमांक दिला आहे. यावर संपर्क केल्यावर राडारोडा उचलण्याची व्यवस्था करण्यात येईल. बांधकाम राडारोडयामध्ये कॉक्रीट, माती, स्टील, लाकूड, विटा आणि रेती मधील सिमेंट या बांधकाम साहित्याशिवाय इतर कचरा मिक्स करू नये. वाहतुकीसाठी नियुक्त केलेल्या कंपनीस कळविल्यावर किंवा स्वत:चे वाहनाने मोशी येथील प्लँटवर आणून टाकता येईल.
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात बांधकाम राडारोडा टाकण्यासाठी जागा निश्चित केली असून त्याचठिकाणी राडारोडा टाकावा. तसेच, शहरातील खासगी, शासकीय, निमशासकीय, ठेकेदाराकडून (Bulk Generator) निर्माण होणाऱ्या बांधकाम राडारोड्याच्या अंदाजे प्रमाण व ठिकाण महापालिकेकडे नोंदणी केल्यानंतर आवश्यक क्षमतेच्या कंटेनरची सोय करण्यात येईल. सी आणि डी वेस्टच्या राडारोड्याच्या प्रमाणात निश्चित केलेल्या दरानुसार २५ टक्के आगाऊ रक्कम जमा करावी. परिसरात बांधकाम राडारोडा निर्मितीदारांकडून व त्यावर प्रक्रियेसाठी बांधकाम राडारोडा उचलण्यासाठी व मोशी राडारोडा प्रक्रीया केंद्रापर्यंत प्रतिटन प्रति किमी १५ रुपये वाहन खर्च तसेच बांधकाम राडारोडा प्रक्रीया शुल्क प्रतिटन २५०रुपये आकारण्यात येणार असल्याचेही आयुक्त पाटील यांनी सांगितले.
राडारोडयापासून पुर्ननिर्मीती
जमा होणाऱ्या राडारोडयावर प्रक्रीया करून निर्माण झालेले बांधकाम साहित्य महापालिकेसाठी व शहरासाठी खासगी, शासकीय व्यवसायिकांना बाजारभावापेक्षा २० टक्के दराने उपलब्ध करून दिले जाणार आहे. महापालिकेच्या विकास कामामध्ये राडारोडयापासून निर्माण झालेल्या बांधकाम साहित्याचा पेव्हर ब्लॉक, कर्व्ह स्टोन, चेंबर कव्हर, दगड, वाळू, विटा इत्यादीचा वापर कमीत कमी २० टक्के करणे बंधनकारक राहील.