महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ फेब्रुवारी । भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी जाहीर केलेल्या पतधाेरण आढाव्यामध्ये ४ टक्के रेपाे दर आणि ३.३५ टक्के रिव्हर्स रेपाे दर या दाेन प्रमुख धाेरणात्मक दरांत काेणताही बदल न करता ते जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. गृह आणि कार कर्जदारांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. कारण ईएमआय महाग होणार नाही. नवीन कर्ज घेणाऱ्यांनाही यामुळे दिलासा मिळणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या नाणेनिधी धोरण समितीने (एमपीसी) कोरोनाग्रस्त अर्थव्यवस्थेत शाश्वत सुधारणा करण्यासाठी व्याजदर कमी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यमान आर्थिक वर्षात ५.३ टक्के महागाई दर असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. नवीन पिकांची आवक, कोरोना संसर्ग कमी होणे, पुरवठ्यातील अडथळे कमी होणे आणि चांगला मान्सूनमुळे २०२२-२३ या वर्षात महागाई ४.५ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची अपेक्षा आहे. मात्र, जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींमुळे महागाई वाढण्याचा धोका आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील
एमपीसीने सलग दहाव्यांदा व्याजदरात काेणताही बदल केलेला नाही. मे २०२० मध्ये रेपो दर विक्रमी नीचांकी पातळीवर आणला गेला. डिसेंबरमधील किरकोळ महागाई नोव्हेंबरमधील ४.९१% वरून ५.५९% वर पोहोचली. ही पाच महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. त्याच वेळी घाऊक महागाई किरकोळ घटून १३.५६ % वर आली आहे. परंतु सलग नवव्या महिन्यात ती दुहेरी अंकात राहिली. एमपीसीने चालू आर्थिक वर्षासाठी ९.२% वाढीचा अंदाज कायम ठेवला आहे.