महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ फेब्रुवारी । पुणे शहर (Pune City) परिसरात पुढील दोन दिवस सकाळी विरळ धुके (Fog) पडेल. तसेच किमान तापमानात (Temperature) वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तवली आहे.परिसरात सध्या दिवसा उन्हाचा कडाका, तर पहाटे धुके पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच दुपारच्या वेळी उन्हाचे बसत आहेत. रविवार (ता. १३) ते मंगळवारपर्यंत (ता. १५) शहर परिसरात दुपारनंतर ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच आठवडाभर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
शिवाजीनगर, लोहगाव, पाषाण, लवळे, चिंचवड, मगरपट्टा सारख्या भागांमध्ये किमान तापमान १३ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे गारठा काहीसा कमी होऊ शकतो.
राज्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून दिवसा उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात ही काहीशी वाढ झाल्याचे दिसून आले. गुरुवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान वाशीम येथे ३२.५ अंश सेल्सिअस, तर नीचांकी तापमान जळगाव येथे १०.३ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. सध्या बिहारपासून कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यात बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पूर्व भारतातील राज्य, विदर्भ, मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान झाले आहे. तसेच पुढील तीन दिवस वायव्य, मध्य भारतात किमान तापमानात २ ते ५ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील हिमालयातील भागात बर्फवृष्टी तर, काही ठिकाणी पावसाच्या सरींची शक्यता आहे. त्यात उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यातील काही ठिकाणी गारठा वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात कमाल तापमानात वाढ होत असताना रात्रीच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. उत्तर भागातील जिल्ह्यात गारठा तर, दक्षिणेकडील जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला आहे. पुढील दोन दिवस विदर्भात गारठा वाढणार असल्याचे तसेच, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.