‘व्हॅलेंटाइन डे’च्या पूर्वसंध्येला बाजारपेठेला ‘गुलाबी’ रंग, गुलाबाच्या दरांमध्येही वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ फेब्रुवारी । तरुणाईच्या उत्साहाला उधाण आणणारा व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला गुलाब फुलांना सर्वाधिक मागणी होती आणि गुलाबाच्या फुलांनी चांगलाच भाव खाण्यास सुरुवात केली आहे. व्हॅलेंटाइन डेमुळे शहरातील बाजारपेठांनाही ‘गुलाबी’ रंग आला होता.

व्हॅलेंटाइन डे निमित्ताने उस्मानपुरा सर्कल, निराला बाजार, गुलमंडी, औरंगपुरासह शहरातील विविध मॉलमधील गिफ्ट शॉपमध्ये खरेदीसाठी तरुणाईची काही दिवसांपासून गर्दी दिसून येत आहे. दालनात यानिमित्ताने विविध वस्तू दाखल झाल्या आहेत. हार्ड कुशन, मेसेज कप, चॉकलेट बूके यासह पर्सनलाइज्ड गिफ्ट आयटम खरेदीवर ग्राहकांचा जोर असतानाच गुलाब फुलांनाही नेहमीप्रमाणे मोठी डिमांड आली होती. फुल विक्रेत्यांनी आपली दालने विविध रंगी गुलाब फुलांनी सजवून ठेवली आहे. फोटोसेशनसाठी खास सोय अनेक ठिकाणी करण्यात आली आहे.

प्रेमाचे प्रतीक म्हणून समजले जाणारे गुलाबाचे फूल आपल्या आवडत्या व्यक्तीला दिले जाते. बाजारात आलेल्या गुलाबाच्या फुलांमधील मोहक आणि ताजे असे गुलाब निवडून आपल्या मनातील प्रेमाची नाजूक भावना व्यक्त करण्यासाठी प्रेमवीर त्याची खरेदी करतात. मात्र, यंदा गुलाब फुलांनी चांगलाच भाव खाण्यास सुरुवात केल्याने प्रेमवीरांना त्यासाठी थोडी अधिक पैसे मोजावे लागणार असे चिन्ह आहे.

स्थानिक भागातून काही प्रमाणात गुलाब फुलांची आवक होते. यासह पुणे तळेगाव दाभाडे, कोल्हापूर, जयसिंगपूर, नगर, नाशिक आदी भागातून प्रामुख्याने आवक होते. यंदा अमेरिकेला मोठ्या प्रमाणात फुलांची निर्यात झाली आहे. त्यात लग्नसराई असल्यामुळे गुलाबाचे भाव वधारल्याचे व्यापारी अमोल लालसरे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितले. गेल्या आठ ते दहा दिवसआधी ८ ते १० रुपये एका गुलाबाच्या फुलासाठी मोजावे लागत होते. तर पिवळा, पांढरा यासह अन्य रंगाचे गुलाब १५ ते २० रुपयांना मिळत आहेत. व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर या गुलाब फुलांना मोठी मागणी वाढल्याने चांगलेच भाव वधारले आहे.

दर्जेदार लाल रंगाचे डच गुलाबाचे एक फुल सध्या २५ ते ३० रुपयांना मिळत असून पिवळा, पांढरा यासह अन्य रंगाचे गुलाब फुल ३० ते ४० रुपये प्रतिनग असा भाव असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यासह आकर्षक अशी डिझायनर बुकेची क्रेझही तरुणाईमध्ये गेल्या काही वर्षात वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगत ३०० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत डिझायनर बुके उपलब्ध असल्याचे नमूद केले. यासह लिली, कार्नेशन या फुलांसह आकर्षक रोपांनाही वाढणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *