महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ फेब्रुवारी । शनिवारी दारूच्या एका ऑफरमुळे दुकानांबाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. ही ऑफर होती, एका बाटलीवर एक बाटली मोफत मिळण्याची. त्यामुळे तळीरामांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या.
शनिवार आणि रविवार अशा जोडून सुट्ट्यांच्या दिवशी दारूविक्री जोमात करण्याची टूम नवी दिल्लीतील काही जणांनी काढली. त्यामुळे दिल्लीतील काही वाईन शॉप्सनी एक ऑफर जाहीर केली. या दुकानांमध्ये जहांगीरपुरी, शादहरा, मयूर विहार, अशोक नगर इथल्या दुकानांचा समावेश होता.या दुकानदारांना आपल्याकडील स्टॉक संपवायचा होता. त्यामुळे त्यांनी काही विशिष्ट ब्रँडच्या दारूवर 35 टक्के सूट जाहीर केली. त्यात असेही काही ब्रँड होते, ज्यांची विक्री झाली नव्हती. त्यामुळे ते विकण्यासाठी दुकानदारांनी एका बाटलीवर एक मोफत अशी नवीन ऑफर दिली. मग काय, दिल्लीत अनेक वाईन शॉप्सच्या बाहेर दुकानांच्या रांगा लागल्या.
ही ऑफर जाहीर करण्याचं कारण म्हणजे अनेक दुकानदारांना मार्च अखेरपर्यंत आपला जुना स्टॉक संपवायचा होता. जेणेकरून ते नवीन आर्थिक वर्षात आपल्या परवान्याचं नूतनीकरण करू शकतील. त्यामुळे आहे तो स्टॉक संपवण्याकडे अनेक दुकानदारांचा कल होता. दुसरं कारण म्हणजे सध्या दिल्ली आणि परिसरात लग्नाचा मोसम सुरू झाला आहे. लग्न, विकेंड तसंच घटलेले दर यांमुळे लोकांनी रांगा लावून दारू खरेदी केली.