महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ फेब्रुवारी । राज्य सरकारच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्याच्या विरोधात अण्णा हजारे आंदोलनावर ठाम आहेत. अण्णा हजारे उद्यापासून प्राणांतिक उपोषणाला (Anna Hajare Agitation Against Wine Selling Decision) बसणार आहे. सरकारच्या अशा निर्णयामुळे मला जगायची इच्छा नाही. तुमच्या सरकारला निरोप पोहोचवा, असं अण्णा हजारे म्हणाले. (Anna Hajare Agitation Against Maharashtra Government)
आज महाराष्ट्रात दारूची दुकानं कमी नाही. बिअर बार, वाईन शॉप आणि परमीट रुम देखील आहेत. या सर्व दुकानात दारू मिळतेय. मग वाईन सुपर मार्केटमधून का विकताय? सर्व लोकांना व्यसनाधीन बनवायचं आहे का? लोकांना व्यसनाधीन बनवून आपल्याला जे साधायचं ते साधता येतं, असा आरोप देखील अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.
सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील बालके, तरुण, मुली, महिलांवर खूप अत्याचार होतील. त्यामुळे वाईन निर्णयाविरोधात मी सरकारला निरोप पाठवला. त्यानंतर त्यांचे कर्मचारी निरोप घेऊन आलेत. तसेच एक्साईजचे आयुक्त आले. वाईन खुल्या बाजारात विकण्याबाबत त्यांना प्रश्न विचारला. मला तुमच्या राज्यात जगायचं नाही. तुमच्या सरकारला निरोप पोहोचवा, असं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात वाईन सुपर मार्केटमध्ये विकली जाते, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? या सरकारच्या निर्णयामुळे मला जगायची इच्छा नाही. ८४ वर्ष खूप झाले. मी जगून घेतलं. आता जगायची इच्छा नाही, असं अण्णा म्हणाले.
राज्याचे एक मोठे अधिकारी माझ्याकडे आलेत. त्यांनी सांगितलं की जनतेचं मत घेऊन आम्ही निर्णय घेऊ. त्यांनी हे सर्व तोंडी सांगितलं नाही. त्यांनी मला लेखी लिहून दिलंय. पण, मी माझ्या उद्याच्या उपोषणावर कायम आहे. मी लग्न केलं नाही. पण, मी समाजासाठी लढतो आहे. मरताना देखील मी समाजासाठी मरणार आहे, असंही अण्णा म्हणाले.