वाईनविक्री विरोधातील अण्णा हजारेंचं उपोषण मागे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ फेब्रुवारी । अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी काही वेळापूर्वी वाईनविक्रीविरोधातील स्वतःची भूमिका स्पष्ट केली होती. मी उद्यापासून उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण, ग्रामसभेत ठराव पास झाला असून अण्णांनी त्यांचं उपोषण (Anna Hazare Hunger Strike Against Wine Selling) तीन महिन्यांसाठी पुढे ढकललं आहे. याबाबत राळेगणसिद्धीचे माजी सरपंच डॉक्टर धनंजय पोटे यांनी माहिती दिली.

ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांचे उद्या होणारे उपोषण मागे घेण्यात आले आहे. अण्णा हजारेंनी आंदोलन करू नये, असा निर्णय ग्राममसभेत एकमुखाने घेण्यात आला आहे. सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करावी की नाही? आणि अण्णा हजारे यांनी उपोषणाला बसावं की नाही याबाबत ठराव मांडण्यासाठी ग्रामसभा झाली. या ठरावात सरकारने याबाबत घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि अण्णा हजारे यांनी उपोषण करू नये; असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. अण्णांची तब्येत पाहता त्यांना उपोषण करू नये, असं पत्र लिहिण्यात आलं. त्यानंतर अण्णांनी पुढील ३ महिन्यांसाठी उपोषण स्थगित केलं.

सरकारने वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री केली जाते, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? असा सवाल अण्णा हजारेंनी सरकारला केला होता. तसेच मला तुमच्या राज्यात जगायची इच्छा नाही. मी ८४ वर्ष जगलो. आता राज्य सरकारच्या अशा निर्णयामुळे मला जगायची इच्छा नाही. तुमच्या सरकारला निरोप पोहोचवा, असं अण्णा हजारे म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *