महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ फेब्रुवारी । ‘पक्षी आणि वन्यजिवांना सुरक्षित अधिवास मिळावा यासाठी राज्य सरकार गेली दोन वर्षे प्रयत्न करीत आहे. पर्यावरणाबाबत पुणेकरांचा नेहमीच प्रतिसाद मिळत आला आहे. पुण्यातील झाडे, हिरवळ वाचविणे महत्त्वाचे असून डॉ. सलीम अली अभयारण्य परिसरात वनासारखे वातावरण आहे. ते कायम टिकविण्यासाठी अधिकाधिक झाडे लावून ‘थंडगार पुणे’ ही पुण्याची ओळख वाचविणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
आदित्य ठाकरे यांनी डॉ. सलीम अली अभयारण्याला भेट देऊन प्रत्यक्ष कामांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी किधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, आमदार सुनील टिंगरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त मनपा आयुक्त राहुल खेमणार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील आदी उपस्थित होते.
पुणे महापालिकेत झालेला गोंधळ, तसेच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांवर केलेले आरोप याकडे आपण कसे पाहता? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणीय संदर्भ देत ‘आम्ही सगळीकडे ‘डबरी रिमूव्हअल’चे काम करतो आहोत,’ असा टोला लगावला.