महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ फेब्रुवारी । इंडियन प्रीमिअर लीग 2022 साठी बंगळुरूमध्ये लिलाव पार पडला. यात अनेक अचंबित करणाऱ्या बोली लागल्या. ईशान किशन याला जसप्रीत बुमराहपेक्षाही जास्त पैसे मिळाले. मुंबईने बुमराहला रिटेन करताना 12 कोटी दिले होते, तर ईशान किशानला 15.5 कोटी मोजून आपल्या संघात घेतले. तसेच आवेश खानसह अंडर-19 वर्ल्डकप खेळणाऱ्या काही खेळाडूंनाही चांगली रक्कम मिळाली. मात्र काही बड्या खेळाडूंना यंदा खरेदीदार न मिळाल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
1. सुरेश रैना – चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या सुरेश रैनाला यंदा चेन्नईने रिलीज केले होते. त्याची बेस प्राईज 2 कोटी रुपये होते. मात्र धक्कादायकरित्या त्याला कोणीही खरेदीदार मिळाला नाही.
2. सौरभ तिवारी – गतवर्षी मुंबई इंडियन्ससाठी मधली फळी सांभाळणाऱ्या सौरभ तिवारी याला देखील कोणत्याची संघाने खरेदी करण्यात रुची दाखवली नाही. तो देखील यंदा अनसोल्ड राहिला.
3. इम्रान ताहीर – विकेट घेतल्यानंतर आपल्या अनोख्या अंदाजातील सेलिब्रेशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या इम्रान ताहीर याची ही बेस प्राईज 2 कोटी होती, मात्र त्याला कोणत्याही संघाने आपल्या गोटात घेतले नाही. वाढते वय (42) हे देखील यामागील एक कारण आहे.
4. चेतेश्वर पुजारा – चेतेश्वर पुजाराला गेल्यावेळी चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात घेतले होते, मात्र त्याला एकदाही मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही. यंदा तर त्याच्यासाठी बोली लावण्यासही कोणता संघ उत्सुक नव्हता.
5. मार्नस लाबुशेन – ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू मार्नस लाबुशेन देखील यंदा अनसोल्ड राहिला. त्याची बेसप्राईज 1 कोटी होती.
6. इयान मॉर्गन – कोलकाता नाईट रायडर्सने गेल्यावेळी दिनेश कार्तिककडून कर्णधारपद काढून इयान मॉर्गनकडे देण्यात आले होते. त्याची वैयक्तिक कामगिरी काही खास नव्हती. त्यामुळे दीड कोटींची बेसप्राईज असेलल्या या खेळाडूकडे सर्वच फ्रेंचाईजींनी दुर्लक्ष केले.
7. अमित मिश्रा – आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा अमित मिश्रालाही यंदा खरेदीदार मिळाला नाही. वाढते वय हे यामागील कारण असल्याचे बोलले जात आहे.
8. अॅडम झंपा – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळलेल्या अॅडम झंपा याची टी-20 मधील कामगिरी चांगली आहे, असे असतानाही 2 कोटींची बेसप्राईज असलेल्या या खेळाडूला कोणी खरेदी केले नाही.
9. शाकिब अल हसन – बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन यालाही यंदा कोणत्या संघाने खरेदी केले नाही. त्याची कामगिरी चांगली आहे, मात्र वर्तवणूक खराब असल्याने त्याच्याकडे कानाडोळा करण्यात आल्याचे वृत्त आहे.
10. स्टीव्ह स्मिथ – एकेकाळी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहिलेल्या स्टीव्ह स्मिथलाही यासाठीही कोणी बोली लावली नाही. त्याची बेसप्राईज 2 कोटी होती.