एमआयएम आमदार मौलाना मुफ्तीवर गुन्हा दाखल

Spread the love

महाराष्ट्र २४- ऑनलाईन ;मालेगाव; शहरातील सामान्य रुग्णालयात बुधवारी (दि. २५) रात्री एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती व त्यांच्या समर्थकांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे तसेच अन्य कर्मचाऱ्यांना अचानकपणे येऊन शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत डॉ.डांगेसह कर्मचारी काम बंद आंदोलनावर उतरले होते. अखेर याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आमदार मुफ्ती व इतर १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. डांगे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार आमदार मुफ्ती व त्यांचे समर्थक गैरकायद्याची मंडळी जमवून डॉ. डांगे यांच्या कार्यालयात अनधिकृतपणे घुसले. तसेच डॉ. डांगे यांना ‘तुमने मेरा फोन क्यो नही उठाया’ आरोपी खालील दादा को अॅडमिट क्यो किया? असे जोरजोरात आरडाओरडा करीत गोंधळ घातला. यावेळी डॉ. डांगे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की झाली. तसेच डॉ. डांगे यांना वाचविण्यासाठी गेलेल्या अन्य कर्मचाऱ्यांना मुफ्ती समर्थकांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रात्री अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक आर. एन. देशमुख यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुफ्ती यांच्यासह अन्य लोकांवर गुन्हा दाखल करावा, अटक करावी या मागणीसाठी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *